सातारा दि. 18 : जिल्ह्यातील प्रत्येक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीमध्ये (नगरपरिषद / नगरपंचायत) सर्व अधुनिक यंत्रणांनी व कुशल मनुष्य बळाने सुसज्ज असणारे शहरी आरोग्य केंद्र तयार करण्यात यावे. त्याचप्रमाणे एक आदर्श शाळा- मॉडेल स्कूल ज्यामध्ये अद्ययावत कॉम्पुटर लॅब, ग्रंथालय, प्रयोगशाळा व स्पर्धात्मक परिक्षेसाठीची अभ्यासिका असेल असा आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील नगरपरिषद / नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी शहरी भागाचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठकीमध्ये निर्देश दिले. सदर विकास आराखडा तयार करताना त्यामध्ये पुढील पाच वर्षांचे नियोजन करुन शहरासाठी आवश्यक असणा-या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा, पार्किंग व्यवस्था इत्यादीचा समावेश असेल. सोलर लाईट, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, ड्रेनेज व्यवस्था, फिरते विक्रेते, पार्किंग व्यवस्था यांचा समावेश करण्याबाबत सांगितले.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, सातारा जिल्ह्यास ऐतिहासिक वारसा असल्याने पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पर्यटकांना आवश्यक सुविधा पुरवून पर्यटन क्षेत्रांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्या, त्या दृष्टीने सर्व नगरपरिषद / नगरपंचायत नी विशेषतः सातारा, पांचगणी, महाबळेश्वर नगरपरिषदांनी त्यांचे पर्यटन आराखडा प्रस्ताव तयार करुन तात्काळ सादर करा. तसेच संबंधित नगरपरिषदांनी वाहतूक व्यवस्थापन व वाहनांच्या पार्किंग याबाबत आराखडा तयार करावा, यासाठी तातडीचे उपाय म्हणून पोलीस विभागाशी संपर्क साधून वाहतूक सुरळित चालेल असे पहावे.