फलटण प्रतिनिधी :
दि. १ सप्टेंबर पासून शहरातील ५ मुख्य चौक व परिसरात नो पार्किंग झोन जाहीर केले होते तर नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता मात्र केवळ कागदी घोडे नाचवण्यात पटाईट फलटण नगर पालिका प्रशासन व फलटण शहर पोलिसाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने फलटणच्या नो पार्किंग झोनचा फज्जा उडल्याचे समोर आले आहे. तर नो पार्किंग झोन जाहीर करताना कागदी घोडे नाचवत हजारो रुपयांचा चुराडा करणाऱ्या प्रशासनाला आता फलटणकर नागरिक आता जाब विचारात आहेत.
फलटण शहरातील वाहतूक आणि पार्किंगला शिस्त राहिली नसल्याचे अनेकदा पाहायला मिळत आहे. अनेक वाणिज्य मिळकतदारांनी आणि दुकानदारांनी पार्किंगसाठी जागा न ठेवल्याने शहरात मोठ्या प्रमाणात पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे.
फलटण शहर पोलिस ठाणे व फलटण नगर परिषद यांचे संयुक्त नियोजनाने शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी, शहरामध्ये नगर परिषद कार्यालय लगतचे मुधोजी वाहन तळ व डेक्कन चौक येथील वाहन तळ या दोन ठिकाणी विनामुल्य वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जाहिर करून या ठिकाणी नागरीकांनी स्वतःच्या जबाबदारीवर वाहने पार्कींग करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने डी. एड. कॉलेज चौक, गजानन चौक, डेक्कन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले होते. दि. १ सप्टेंबर पासून उपरोक्त ठिकाणी वाहने पार्कंग केलेली आढळलेस मोटार वाहन अधिनियम अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी लोकांना धोका, अडथळा किंवा गैरसोय होईल अशा प्रकारे गाडी उभी करणे, या गुन्हयासाठी प्रथम वेळी रक्कम ५०० रुपये व व्दितीय वेळी रक्कम १५०० रुपये इतका दंड आकारणेत येणार असल्याचे फलटण नगर परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले असताना मात्र प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने पार्किंग झोनचा फज्जा उडाल्याचे बोलले जात आहे.
ना कोणती कारवाई : ना कोणी ट्राफिक कर्मचारी
दि. १ सप्टेंबर पासून शहरातील ५ मुख्य चौक व परिसरात नो पार्किंग झोन जाहीर केले होते तर नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता मात्र या पाचही चौकत नेहमीप्रमाणे वाहने वाहतुकीस अडथळा होईल अशी लावण्यात आली होती. या ठिकाणी ना कोणी ट्राफिक कर्मचारी हजर होता न कोणत्याही वाहनावर कारवाई करण्यात येत होती. सर्व काही नेहमीप्रमाणे पार्किंगची पुरती वाट लागलेली शहरात दिसत होते.
मुख्याधिकाऱ्यांचे पोलीस प्रशासनाकडे बोट - या संदर्भात विचारण्याकरिता मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, फलटण नगर पालिकेचे कर्मचारी व टोइंग व्हॅन आपण उपलब्ध करून दिली आहेत मात्र पोलिस प्रशासनाकडे कर्मचारी नसल्याचे त्यांनी सांगितले.