फलटण प्रतिनिधी : भारतीय कृत्रिम अपंग निर्माण निगम, कानपूर या केंद्र शासन मान्यताप्राप्त संस्थेमार्फत फलटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत आवश्यक असणारी सहाय्यक साधने पुरविण्यासाठीचे साहित्य या कार्यालयास प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम दि. २३ व दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत शासकीय धान्य गोडावून, फलटण येथे आयोजित करण्यात येत असल्याचे फलटण पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी कळविले आहे.
या कार्यक्रमासाठी खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, भारतीय कृत्रिम अपंग निर्माण निगम कानपूर संस्था अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील १३०२ व फलटण नगर परिषद हद्दीतील १४० असे एकूण १,४४२ दिव्यांग लाभार्थीना सहाय्यभूत साहित्याचे (तीन चाकी सायकल, वॉकर, चष्मे, कुबडी, स्वयंचलित सायकल, स्मार्ट फोन, श्रवण यंत्र इत्यादी) वाटप करण्यात येणार असल्याचे फलटण पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी कळविले आहे.
पात्र लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत व नगरपरिषद यांना देण्यात आल्या आहेत. दिव्यांग लाभार्थींनी सदर यादीमध्ये आपल्या नावाची खात्री करून कार्यक्रमासाठी नियोजित दिनांक व वेळी आधारकार्डच्या २ झेरॉक्स प्रती घेवून उपस्थित रहावे, जे लाभार्थी अंथरुणाला खिळून आहेत किंवा येता येणे शक्य नाही त्यांनी त्यांचे जवळचे नातेवाईक यांचेजवळ आधारकार्ड द्यावे असे आवाहन फलटण पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी केले आहे.