आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येऊन शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. मात्र, फलटण शहराची वाटचाल ही तेवढ्याच झपाट्याने अस्वच्छतेकडे होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लक्ष्मीनगर भागातील माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या निवासस्थानसमोर चेंबर फुटल्याने पाणी साठवून घाणीचे व मच्छरांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात चक्क एक महिला पडल्याचे कळते आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी या कडे लक्ष देऊन तात्काळ यावर उपाय योजना करावी अशी मागणी फलटणकर नागरीक करताना दिसत आहेत.
एकीकडे साथ रोगांची धास्ती अन शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य यामुळे भविष्यात साथ रोग वाढल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधूनच उपस्थित केल्या जात आहे. स्वच्छतेवर किती खर्च होतो? मात्र, फलटण शहरात निधी तर मिळतो; मात्र तो निधी खरोखरच स्वच्छतेच्या कामावर किती खर्च होतो हे शहरातील अस्वच्छतेवरून स्पष्ट होते.
शहरातील अनेक भागातील नाल्या या घाणीने तुडूंब भरलेल्या असून ते घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. शहर स्वच्छतेवर भर असल्याची धूम स्थानिक प्रशासनाकडून ठोकली जात असली तरी शहरात अनेक ठिकाणी असलेली घाण व कचरा हे स्वच्छतेबाबत किती जागृत आहे हे दाखवून देते.