फलटण प्रतिनिधी:- फलटण आगारातून सायंकाळी ५:३० वाजता सुटणारी फलटण-आसू एसटी बस शुक्रवार दि. २१ रोजी एअर लॉक झाल्यामुळे धुळदेवच्या पुढे बंद पडली. यावेळी अनेक शाळेतील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना जीव मुठीत धरून खाजगी वाहनातून प्रवास करावा लागला. त्यामुळे फलटण आगारचा सतत सुरू असलेला मनमानी कारभार सुधारणार की नाही, की एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुरक्षित प्रवासाची हमी देणारी एसटी बसच आता विद्यार्थी आणि प्रवाश्यांसाठी धोकादायक ठरत आहे. फलटण आगाराचे खिळखिळ्या झालेल्या एसटीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. फलटण येथून आसूकडे जाणारी सायंकाळी ५:३० वाजताची एसटी बस बंद पडली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसह प्रवाशांनी खाजगी वाहनातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रवाशांना विचारले असता समजले रात्री ५:३० वाजता फलटण येथून सुटणारी आसू बस गेल्यानंतर तब्बल २ तासांनी म्हणजेच ७:३० वाजता एसटी बस असून तीही बस वेळेवर लागत नाही. त्यामुळे मिळेल त्या खाजगी गाडीने प्रवास करत असल्याचे विद्यार्थी व प्रवाशांनी सांगितले. दरम्यान, फलटण तालुक्यातील प्रमुख मार्गांवर बसेस सोडण्यापेक्षा पुणे, मुंबई, पनवेल, डोंबिवली इकडे मोठ्या प्रमाणावर बसेस सोडण्याचा कल या आगर प्रमुखांचा आहे. त्यामुळे सातारा आगार प्रमुख राहुल पलंगे याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फलटण आगारातून ग्रामीण भागात सुटणाऱ्या एसटी बसेस फलटण आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाहीत, त्यामुळे फलटण आगार प्रमुख व्ही. जगदाळे यांचे व्यवस्थापन ढिसाळ असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. फलटण आगारचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडून गेले असून फलटण-आसू, फलटण-मुंजवडी, फलटण-गुणवरे आदी गावांना सोडण्यात येणाऱ्या बसेस फलटण आगारातून सतत रद्द करणे, वेळेवर न लावणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे फलटण आगारच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थी, नोकरदार व प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
फलटण-आसू एसटी बस धुळदेव गावच्या पुढे बंद पडल्यानंतर वृत्तपत्र प्रतिनिधी यांनी आगार प्रमुख वासंती जगदाळे आणि साहाय्यक वाहतूक निरीक्षक राजेंद्र वाडेकर यांना फोनच्या माध्यमातून संपर्क साधला असता फोन उचलला नाही. त्यानंतर सातारा आगार प्रमुख राहुल पलंगे यांना संपर्क साधला असता फलटण आगारात हालचाल सुरू झाली. त्यामुळे फलटण आगारातील अधिकारी फक्त सातारा आगार प्रमुखांचाच आदेश पाळणार की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
एस.टी अधिकाऱ्यांची टोलवा टोलवी
फलटण येथून सायंकाळी ६:३० वाजता सुटणारी फलटण-आसू ही बस प्रवाशांची मागणी असेल तर सुरू करण्यात येईल. परंतु या आठवड्यात जर सुरू करायची असेल तर फलटण आगारात बसेसची स्थिती पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही.
- वासंती जगदाळे, फलटण आगार प्रमुख