फलटण प्रतिनीधी :- शहरातील फ्लेक्स लावण्यास नगर परिषदेने ठराव घेवून बंदी घातली असतानाही फलटण शहरात सर्वत्र जाहिरातीचे फ्लेक्स अनेक ठिकाणी लावण्यात आले असून फ्लेक्स बंदी असताना जाहिराती झळकणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर नगर परिषदेने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आजअखेर फलटण शहराने स्वच्छ सर्वेक्षणात व वसुंधरा, माझी वसुंधरा अभियानात सहभाग घेतला आहे. त्यातंर्गत शहर सौंदर्यीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले होते. यापूर्वी शहरातील हद्दीत फ्लेक्सला नगर परिषदेत ठराव मंजूर करून बंदी घातली गेली आहे. या बंदीमुळे फ्लेक्सने गजबजलेले फलटण शहर यामुळे फ्लेक्समुक्त झाले होते. जाहिराती, वाढदिवस, अभिनंदनाच्या होर्डींग झळकताना दिसत नव्हत्या. तसेच शहराचे होत असलेले विद्रुपीकरण टाळण्यासाठी अनधिकृतरित्या लावलेले बॅनर्स, होर्डिग्स काढून टाकण्याचे व कडक कारवाईचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत असे असताना फलटण शहरात फ्लेक्स बंदी असतानाही अशा आदेशांना व फ्लेक्स बंदील काहींनी हरताळ फासलेला दिसत आहे. विंचुर्णी रोड, गिरवी रोड, पुणे रोड या ठिकाणी मोठया प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहे
काही दिवसापासून शहरात जाहिरातीचे फ्लेक्स शहरात अनेक ठिकाणी नगर परिषदेच्या हद्दीत लावलेले दिसत असून मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या या फ्लेक्सकडे नगर परिषद डोळेझाक तर करीत नाही ना असा सवाल विचारला जात आहे. शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचे स्वप्न एकीकडे पाहिले जात असतानाच दुसरीकडे मात्र काही जणांकडून शहर विद्रुपीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी जाहिरातिचे छोटे छोटे अनेक फ्लेक्स लावण्यात येत असल्याने, शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे. अशा विनापरवाना फ्लेक्स, होर्डिंग आणि बॅनरवर कारवाई करण्याबाबत नगर परिषद प्रशासनाकडून हलगर्जीपणा केला जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जर वेळीच नगर परिषद प्रशासनाने कडक कारवाई न केल्यास पुन्हा जुने दिवस समोर येतील यात शंका नाही.
अशा अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे शहरांचे विद्रुपीकरण होत असून फेक्सबंदीच्या आदेशास डावलून मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. नगर परिषदेने फ्लेक्सबाबत शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत असून नगर परिषद आता कडक कारवाई करणार की कागदी घोडे नाचवून नेहमी प्रमाणे कारवाईस बगल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.