पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपली जादू कायम ठेवत पुन्हा एकहाती सत्ता मिळविली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या 292 जागांपैकी 216 जागा मिळाल्या असून निर्विवाद बहुमत मिळाले आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपली जादू कायम ठेवत पुन्हा एकहाती सत्ता मिळविली आहे. ममतांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या 292 जागांपैकी 216 जागा मिळाल्या असून निर्विवाद बहुमत मिळाले आहे.
भाजपचा पराभव झाला असून 75 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर डाव्या पक्षांच्या आघाडीला एकही जागा मिळविता आली नाही. मात्र, पं. बंगालच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जींचा पराभव झाला असून शुभेंदू अधिकारी 2 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यामुळे बंगालमध्ये ‘गड आला पण सिंह गेला’ अशी गत तृणमूल काँग्रेस पक्षाची झाली आहे.
केरळमध्ये राजकीय इतिहासाला कलाटणी मिळाली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला जनतेनं बहुमत दिलं आहे. एलडीएफने 93 जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावं लागणार आहे. यूडीएफ 43 जागांवर आघाडीवर आहे. आसामात सत्ता काबिज करून भाजपानं दणदणीत घरवापसी केली आहे. काँग्रेस आणि भाजपात चुरस होती. मात्र, भाजपानं सुरूवातीपासूनच आघाडी घेतली.
भाजपाने बहुमताचा आकडा पार करत 77 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 48 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपाला स्पष्ट जनमत मिळताना दिसत आहे. तामिळनाडूत सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि द्रमुक यांच्यात लढत बघायला मिळाली. सुरूवातीला दोन्ही आघाड्यांमध्ये अटीतटीची लढत सुरू झाली. मात्र, नंतर द्रमुकने जोरदार मुसंडी मारली.
तामिळनाडूतील जनतेनं द्रमुकच्या पदरात मतं टाकत स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. द्रमुक 141 जागी आघाडीवर आहे. तर सत्ताधारी अण्णाद्रमुक 89 जागांवर आघाडीवर आहे. 30 सदस्यसंख्या असलेल्या पुदुचेरी विधानसभा निवडणुकीत रात्री 8 वाजेपर्यंत कुणालाही बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. मात्र, भाजपाने 14 जागांवर आघाडी घेतली होती. काँग्रेस आघाडीला 6 जागा तर अन्यला 5 जागा मिळाल्या होत्या.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव
कोलकाता : देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. याआधी ममता बॅनर्जी यांचा 1200 मतांनी विजय मिळवला असल्याबाबत एएनआयनं माहिती दिली होती. त्यामुळं ममता यांचा विजय झाला असल्याचं वृत्त देण्यात आलं होतं. मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा 1953 मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणार्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली आहे.