फलटण प्रतिनिधी -
गरीब, शोषित, पीडित समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून मांडणारे आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे लेखणीद्वारे प्रभावी टिपण करणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा फलटणमध्ये व्हावा ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची फलटणकरांनी अजून किती वर्ष प्रतीक्षा करायची अशी चर्चा आता समाजामध्ये होऊ लागली आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं आश्वासन वेळोवेळी अनेक राजकीय नेत्यांनी सभांमधून दिले होते. मात्र त्यावर अद्यापही प्रत्यक्ष कृती नसल्याने समाजामध्ये नाराजीचा सुरु दिसू लागला आहे.
फलटण नगरपरिषदेने पाचबत्ती चौकामध्ये अण्णाभाऊंच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु ती जागा अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचे दिसत आहे.
आण्णा भाऊंची जयंती १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. त्या दिवशी फलटणच्या राजकीय नेत्यांनी अभिवादन करताना, 'पुतळ्याच्या दिलेल्या आश्वासनाचं काय झालंय?' हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारायला हवा असा संतप्त सवाल समाजामधून विचारला जाऊ लागला आहे.