सातारा, दि. 16 :- हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यावर पूर प्रवण व दरड प्रवण गावातील नागरिकांना त्यांच्या पशुधनासह तात्काळ हलविण्याची व्यवस्था करावी. नागरिकांच्या निवारा, अन्न, पाणी, विज आदी सोयी सुविधांबरोबर जनावरांसाठी पाण्याची व चाऱ्यांची व्यवस्था करावी. नागरिकांच्या स्थलांतराची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांच्याकडे द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपवनंसरक्षक आदिती भारद्वाज जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भूस्खलन होण्याआधी निसर्गाकडून, पशु पक्षांकडून संकेत मिळातात. त्या संकेतांबाबतची दरड प्रवण गावांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, असे संकेत दिसल्यास तात्काळ तेथील नागरिकांना हलविण्यात यावे. पाटण, जावली, महाबळेश्वर व वाई या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. सर्व नगरपरिषदांनी गटारे, नाले संपूर्ण स्वच्छ होतील हे पहावे. तसेच लगतच्या तलावातील गाळ काढण्यावर भर द्यावा.
आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणारे साथींच्या रोगांबाबत पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवावा. साथींचा रोगाचा जास्त प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे. पाटबंधारे विभागाने नदीपात्रालगतची, नदीपात्रातील अतिक्रमणे हटवावित. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा. कृषी विभागाने प्रत्येक मंडलामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसले नाहीत त्या ठिकाणी पर्जन्यमापक प्राधान्याने बसवून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.
पुराचा संभाव्य धोका असणाऱ्या गावांना अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध करुन द्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावे संभाव्य दरडप्रवण ठिकाणी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध ठेवावी. प्रत्येक विभागाने नोडल ऑफीसरची नियुक्ती करुन अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी. सर्व विभागांनी तालुकास्तरावर मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन आराखडा 20 मे पर्यंत सादर करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केल्या.
जिल्ह्यातील होर्डीग व बंधाऱ्यांचे स्ट्रक्चर ऑडीट करा
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील होर्डीग व पाटबंधारे विभागाने बांधलेल्या पाझर तलावांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा.
होर्डीगचे स्ट्रक्चरल ऑडट शहरी भागात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी तर महामार्गावरील स्ट्रक्चर ऑडीट रस्ते विकास महामंडळाने करावे. पाझर तलावांचे स्ट्रक्चरल ऑडीट पाटबंधारे विभागाने करावे. स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल येत्या 15 दिवसात सादर करावे. या कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत दिले.