फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यात ५ गोवंश जनावरे लम्पी बाधित असून फलटण तालुक्यातील लम्पी आजारावर उपाययोजना आणि उपचार याबाबत पशूवैद्यक अधिकार्यांची बैठक फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी बोलविली होती.
फलटण तालुक्यात ५ गोवंश जनावरे लम्पी बाधित :
गेल्यावर्षी राज्यात थैमान घालणाऱ्या पशुधनामधील लम्पी आजाराने आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. फलटण तालुक्यात ही अनेक भागात लम्पी बाधित पशुधन समोर येत आहे. फलटण तालुक्यात सध्या ५ गोवंश जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत. लम्पी आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकर्यांना त्वरित प्रतिसाद देणे, औषधांचा साठा उपलब्ध करणे आणि लसीकरण १०० टक्के पूर्ण करणे ही उद्दिष्टे आज झालेल्या बैठकीत निर्धारीत करण्यात आली, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
लम्पी आजार कसा होतो :
लम्पी हा विषाणूजन्य चर्मरोग साथीचा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे गायींमध्ये आढळून येतो. सर्व वयोगटातील नर व मादी जांनावरांमध्ये हा आजार आढळून येतो. उष्ण व दमट हवामान (कीटकांची वाढ जास्त प्रमाणात ) रोग प्रसार होण्यास अधिक पोषक असते. आजारामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी प्रादुर्भाव झालेली जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते. वेळीच उपाययोजना नाही केल्यास मृत्यू होतो. पर्यायाने पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खूप विकृत दिसते. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माशा (स्टोमोकसिस ), डास (एडीस), गोचीड, चिलटे (क्यूलीक्वाईड्स) यांच्यामार्फत होतो. तसेच या आजाराचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होतो.
लम्पी आजाराची प्रमुख लक्षणे :
बाधित जनावरामध्ये या आजाराचा सुप्तकाळ साधारणपणे 2-5 आठवडे एवढा असतो. या आजारामध्ये प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. सुरुवातीस भरपूर ताप येतो. चारा खाणे, पाणी पिणे कमी अथवा बंद होते. दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू 10-20 मिमी व्यासाच्या गाठी येतात. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे फुफ्फुसदाह व स्तनदाह आजाराची बाधा पशुमध्ये होऊ शकते. पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी :
तापीच्या कालावधीमध्येच जनावरास उपचार होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे चारा कमी खाणाऱ्या जनावराचा तात्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावा. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवावीत. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, माशा, गोचिड व तत्सम कीटकांचा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषधांचा वापर करुन बंदोबस्त करणे. तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत म्हणून औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करु नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 मधील कलम 4(1) अन्वये पशूंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.
तुकाराम मुंडेंचा अधिकाऱ्यांना इशारा : राज्यातील अनेक भागात लम्पी बाधित पशुधन समोर येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून, याबाबतीत उपयोजना करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान, लम्पीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी दिला आहे.