दहिवडी ः उच्च न्यायालयाच्या निकालानुसार माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक प्रक्रियेस निवडणूक प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विजया बाबर यांची नियुक्ती करण्यात आली असून बाजार समितीसाठी 7 ऑगस्टला मतदान व 8 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा 6 जुलैला निवडणूक कार्यक्रम प्रसिध्द करण्यात येणार आहे. 6 जुलै सकाळी 11 पासून 12 जुलै रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज दाखल करता येतील. 13 जुलै रोजी सकाळी 11 पासून अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जाची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिध्द करण्यात येईल. 14 जुलै सकाळी 11 वाजल्यापासून 28 जुलै दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेता येतील. 29 जुलै सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करून चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान घेण्यात येईल. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होणार आहे. बहुचर्चित माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.