फलटण प्रतिनीधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे बिगुल वाजले असून प्रशासन यासाठी जय्यत तयारी करत आहे. याचाच एक भाग म्हणून निवडणूक कर्मचारी व अधिकारी यांचे प्रशिक्षण फलटण येथे संपन्न झाले. यावेळी सांख्यकी माहिती देतानाच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी निवडणूक टक्केवारी जास्तीतजास्त वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत व आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आवाहन प्रशिक्षण कार्यक्रमात ढोले यांनी केले.
माढा लोकसभा मतदार संघ अंतर्गत २५५, फलटण विधानसभा मतदार संघातील नियुक्त केलेले क्षेत्रीय अधिकारी, विषयवार नियुक्त केलेले नोडल अधिकारी, तसेच सर्व संबंधित कर्मचारी यांचा प्रशिक्षण वर्ग निवडणूक नियंत्रण कक्ष बी.एस.एन.एल कार्यालया शेजारी घेण्यात आला.निवडणूक कार्यक्रम घोषीत झालेपासून आचारसंहिता कक्षेतील नियुक्त नोडल अधिकारी, गाव पातळीवर नियुक्त केलेले क्षेत्रीय कर्मचारी व सर्व संबंधित कर्मचारी यांनी निवडणूक घोषणा झाली की शासकीय मालमत्तेवरील राजकीय पदाधिकारी असलेले बोर्ड, जाहिराती, पेपरने अथवा कापडाने झाकणेत याव्यात. तसेच खाजगी मालमत्तेवरील बोर्ड, पक्षाचे झेंडे इत्यादी निवडणूकीची घोषणा झालेपासून ७२ तासाचे आत काढण्याबाबत सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, ४३ माढा लोकसभा मतदार संघ यांनी सूचना दिल्या.
सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच गावपातळीवरील क्षेत्रीय कर्मचारी यांनी आपल्या नियुक्त गावामधील मतदान केंद्र सुस्थितीत असलेबाबत खात्री करावी. मतदानाची टक्केवारी वाढविणेचे दृष्टीने मतदार जनजागृती पथकातील नोडल अधिकारी यांनी गावपातळीवर मतदार जनजागृतीबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन, पथनाट्य किंवा कलापथकाचे माध्यमांतून मतदार जनजागृती करणेबाबत सूचना दिल्या, एक खिडकी योजनेतील नियुक्त नोडल अधिकारी व सर्व संबंधित कर्मचारी यांनी निवडणूक विषयक विविध परवानग्या मुदतीत देण्याबाबत आवश्यक ती दक्षता घेणेबाबत सूचीत केले. तसेच इतर विषयाचे सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांना दिलेल्या जबाबदा-या काटेकोरपणे पाळणेबाबतच्या सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.