सातारा दि. 14 : जिल्हा परिषद सेस अंतर्गत जिल्हयातील शेतऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येत आहेत. यापुर्वी 11 विविध योजनांची अंमलबजावणी सुरू असून जिल्हयातील दुष्काळजन्य परिस्थितीवर राबविण्यात येत असलेल्या विविध उपायोजना सोबतच जनावरांच्या चाऱ्याचा कार्यक्षम वापरासाठी शेतकऱ्यांना मुरघास साठवणूकीसाठी सायलेज बॅग तसेच कडबाकुटी यंत्र या दोन योजनांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे.
या योजनांतर्गत निवड होणा-या शेतक-यांना जिल्हा परिषद सेस योजनेचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यापैकी शेतक-यांना सायलेज बॅगसाठी अनुदान देण्याची योजना नाविण्यपूर्ण असून जिल्हा परिषदेमार्फत स्वनिधीतून सदरची योजना प्रथमच राबविण्यात येत आहे. तर कडबाकुटीसाठी अनुदान देण्याची योजना पूर्वीपासून राबविली जात आहे.
या योजनेसाठी दि. 15 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत . तरी इच्छुक शेतक-यांनी संबंधित पंचायत समतीमधील कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.