फलटण प्रतिनिधी : ग्रामीण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सामुदायिकरीत्या उद्योग निर्मिती केल्यास अर्थकारणाची व्याप्ती वाढेल. महिलांची व्यवसाय उद्योगाच्या माध्यमातून वाढणारी आर्थिक क्षमता गावाचे अर्थकारण सक्षम करण्यास कारणी लागेल यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी उद्योग निर्मितीसाठी पुढे आले पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी व्यक्त केले.
तडवळे ता. फलटण येथे रणरागिणी महिला ग्रामसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी तरडगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखाप्रमुख प्रीती यादव, बचत गट प्रभाग समन्वयक समाधान शिंदे, सरपंच अशोक खराडे, ग्रामसेवक हनुमंत चव्हाण, पत्रकार वैभव जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
केवळ कर्ज घेणे आणि त्याचा वापर व्यक्तिगत करणे या भूमिकेत न राहता पैशातून पैशांची निर्मिती व व्यवसायाची वृद्धी कशी होईल याकडे महिलांनी लक्ष देणे अनिवार्य आहे. बचत गटांची चळवळ मोठी असून यामध्ये ग्रामीण महिलांनी सक्रिय राहून आपल्या बौद्धिक कौशल्याचा वापर केवळ घरापुरता मर्यादित न ठेवता तो व्यवसायामध्ये करावा अशी अपेक्षा प्रा. आढाव यांनी व्यक्त केली.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रीती यादव म्हणाल्या, व्यावसायिक भांडवलाची गरज ओळखून तडवळे येथील १० बचत गटातील ३०० महिलांना आमच्या बँकेने एका दिवसात ५६ लाख रुपये कर्ज त्यांच्या खात्यावर वर्ग केले. या महिलांना शेतीपूरक व्यवसाय करता यावा म्हणून कर्ज रूपाने त्यांच्या भांडवलाची गरज पूर्ण करण्याचे धाडस केले आहे. त्यांनी आपला व्यवसाय आत्मविश्वाने करून भांडवलरूपी दिलेले कर्ज वेळेत फेडले पाहिजे. आमची बँक महिलांच्या पाठीशी सदैव उभी राहील. यावेळी सरपंच अशोक खराडे, ग्रामसेवक हनुमंत चव्हाण, योगिनी बोन्द्रे, मेघा पिसाळ, शिवानी खराडे, राजश्री ढोले यांनी आपली मनोगत व्यक्त केले.
बचत गट प्रभाग समन्वयक समाधान शिंदे प्रास्ताविक भाषणात म्हणाले, तालुक्यातील ग्रामीण भागात महिला बचत गटांना विविध बँकांनी सुमारे ११ कोटी रुपये कर्ज स्वरूपात वितरित केले आहेत. त्याचा वापर आणि परतफेड शंभर टक्के असून याच गावातील ३०० महिलांना बँक ऑफ महाराष्ट्र तरडगाव शाखेच्या माध्यमातून ५६ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. शासन म्हणून आम्ही आपल्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कायम प्रयत्नशील असून महिलांनीही आपले उद्योग व्यवसाय यशस्वी केले पाहिजेत.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत राणी जगताप यांनी केले. सूत्रसंचालन सारिका खराडे यांनी केले व आभार राणी भोसले यांनी मानले. वार्षिक सर्वसाधारण सभेस महिला बचत गट प्रमुख व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.