'हृदय 'हा शब्द पाहिला की आपल्याला ❤️हा सिम्बॉल दिसल्या वाचून राहत नाही , हिंदी मध्ये दिल या शब्दावर तर बरेच चित्रपट आणि गाणी आहेतच की,
मानवी हृदयाचे तीन अंग आहेत.
१. शारीरिक हृदय
२. मानसिक हृदय
३. अध्यात्मिक हृदय
१. शारीरिक हृदय हे डॉक्टर या नात्यानी मला खूप प्रिय आहे.
बारा महिने अठरा काळ अविरत कधीही न-थकणारे असे हे आपले हृदय. हृदय हा अवयव अभिसरण संस्था असलेल्या सर्व प्राण्यामध्ये आढळतो. स्नायूनी बनलेल्या हृदयामुळे रक्तवाहिन्यामधून रक्त लयबद्ध रितीने वाहून नेले जाते.सामान्यपणे मानवी हृदय दर मिनिटास 72 वेळा आकुंचन पावते.
स्त्रियामध्ये हृद्याचे सरासरी वजन 250-300 ग्रॅम आणि पुरुषामध्ये 300-350 ग्रॅम असते.
मानवाचे हृदय हा एक पोकळ, मांसपेशीयूक्त अवयव असून त्याचा आकार बंद मुठीइतका असतो.
आपलं हृदय हे छातीच्या पिंजर्याच्या मध्यभागी किंचित डाव्या बाजूला असते.
हे रोज जवळजवळ १ लाख वेळा आणि मिनटाला ६०-९० वेळा धडकते.
प्रत्येक ठोक्याबरोबर शरीरात रक्त ‘पंप’ करण्याचं काम हृदय करते.
हृदयाला शुध्द रक्तपुरवठा करणाऱ्या हृदयधमन्या ह्याच हृदयाला प्राणवायू आणि अन्न पुरवतात.
हृदय हे डावा व उजवा अशा दोन भागात विभागलेले असते. हृदयाला दोन कप्पे असतात (ज्याला एट्रीयम आणि वेंट्रीकल म्हणतात) जे हृदयाच्या उजव्या व डाव्या बाजूस असतात. हृदयाला एकूण ४ कप्पे असतात.
हृदयाच्या उजव्या कप्प्यात अशुद्ध रक्त आत येते आणि ते फुफ्फूसात पंप केले जाते.
फुफ्फूसात रक्त शुद्ध होते आणि परत हृदयाच्या डाव्या कप्प्यात सोडले जाते. जेथून रक्त शरिराला पोहोचवले जाते.
हृदयाला चार झडपा (वॉल्व्ह) असतात: २ डाव्या बाजूला (मिट्रल आणि एऑर्टिक) आणि २ उजव्या बाजूला (पल्मनरी आणि ट्रायकस्पीड), ज्यामुळे रक्त प्रवाह एका दिशेला वाहतो.
ह्याच हृदयाला रक्त पुरवठा कमी पडला तर हृदय-आघात(Heart attack)हा आजार होतो आणि माणूस त्यात दगावू शकतो.
२. मानसिक हृदय
हे मनाशी निगडित आहे. आपले मन हे हृदयात असते. मन हे आनंदी असेल तर हृदयाचे कार्य एकदम छान चालते. मन दुःखी असेल तर हृदयाचे ठोके नक्कीच चुकतात.
मन जर सैरभैर फिरत असेल तर हृदयाचे ठोके पण पळायला लागतात आणि छातीत धढधड होते.
बदलत्या वेगवान जीवनशैलीतील वाढता ताण-तणाव, चिंता-विकार (ॲन्क्झायटी) हेही हृदयावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष घातक परिणाम करतात. प्रगत देशांत पन्नास टक्के मृत्यू हृदयविकाराने होतात (विकसनशील देशांत ते प्रमाण २५ टक्के आहे), आणि यातल्या अनेक मृत्यूंना मानसिक विकार हातभार लावतात.
कारण उघड आहे. हृदयविकाराला आमंत्रण देणारे घटक कोणते ?
-वाढते कोलेस्टेरोल, -मधुमेह,
-उच्च रक्तदाब,
-लट्ठपणा,
-धूम्रपान,
-व्यायामाचा अभाव आणि -मानसिक ताण.
हे सगळे घटक मानसिक विकारांमुळे अनेकपट वाढतात, त्यामुळे मनोरुग्णांत हृदयविकाराचे प्रमाण अधिक, आणि आयुर्मानही किमान दहा वर्षांनी घटल्याचे आढळते.
हृदयविकाराला प्रतिबंध करणारे, त्याला आटोक्यात ठेवण्यास मदत करणारे तीन घटक मानसिक आरोग्याशी निगडीत आहेत.
ते म्हणजे
-जीवनाविषयी सकारात्मक दृष्टी,
-ताण-नियोजन, आणि -भोवतालच्या आप्त-स्वकीयांशी चांगले, अर्थपूर्ण संबंध.
आनंद , उत्साह, उमेद या सकारात्मक भावना शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, एवढेच नव्हे तर आजारी पेशींच्या दुरुस्तीची प्रक्रिया वेगवान करतात, असे संशोधन सांगते.
तणावाचा थेट संबंध रक्तदाब आणि अंतिमतः हृदयविकाराशी. मात्र, सगळ्यात महत्त्वाचा, फक्त हृदयालाच नव्हे तर जीवनाला आनंदाचे परिमाण देणारा घटक म्हणजे तुमच्या भोवतालच्या लोकांशी असलेले मधुर, निरपेक्ष नातेसंबंध.
इतरांसाठी केलेल्या कुठल्याही स्वार्थरहित कृत्याचा मोद जगी विहरतो, दिशात फिरतो आणि हृदयात भरून उरतो!
मन-हृदय अद्वैतावर बोलताना माणूस फिरून पुन्हा कवितेवर येतो. गालिबविषयी शायर 'दिलावर फिगार'म्हणतो-
पहुँच गया है वो उस मंज़िल-ए-तफ़क्कुर पर (वैचारिक ध्येयाशी)
जहाँ दिमाग़ भी दिल की तरह धड़कता है !
३. अध्यात्मिक हृदय यालाच अनाहत चक्र असेही म्हणतात.
कुंडलिनी जागृत करण्यामध्ये अनाहत चक्राचा फार मोठा वाटा आहे.
प्राणिक healing या शास्त्रा मध्ये आपला प्राण हा अनाहत चक्रात असतो. अनाहत चक्राला जर ऊर्जा दिली तर मरायला लागलेला जीव हा परत येतो हे आता सिद्ध झाले आहे.
'विठ्ठल ' या शब्दात हृदयाचा रक्त पुरवठा वाढवण्याचे आणि त्याचे ठोके नियमित करण्याचे आंतरिक सामर्थ्य आहे हे पण आता सिद्ध झाले आहे.
हृदय थांबले की माणूस दगावला असे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध होते आणि त्याच्या ECG वर straight line येते.असे हे हृदय बहुअंगी बहुआयामी आणि प्रचंड शक्ती युक्त अवयव आहे.
शेवटी असे म्हणावेच लागेल की ज्या गोष्टी हृदया पासून केल्या जातात त्या स्वतःला ही भावतात आणि दुसऱ्यालाही. दिलसे (from the heart ) केलेली कुठलीही गोष्ट ही दुसऱ्याच्या दिलतक पोहचल्याशिवाय राहत नाही हेच खरे.
'हृदय हृदय म्हणजे तरी काय हो!
हा तर एक साधा अवयव हो!
अविरत तुमच्या साठी राबणारा हो!
त्याकडे कधी लक्ष दिलयत का हो!
एकदा प्रेमानी त्याच्या कडे बघा हो!
आयुष्यच तुमचे बदलून जाईल हो!!
निरोगी राहा ,सुरक्षित राहा!
डॉ. प्रसाद जोशी,
सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक, फलटण, सातारा.