फलटण प्रतिनिधी :
फलटण शहरातील अनेक खासगी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून अत्याधिक फी वसूल करण्यासाठी अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची प्रथा वाढत चालली आहे. शासनाच्या अनुदानित शाळांमध्येही, या अकॅडमींचा प्रादुर्भाव होऊन विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याचे चित्र दिसत असल्याचे कामगार संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सनी काकडे यांनी म्हटले आहे.
शाळांचे संस्थापक आणि अकॅडमीचे मालक पालकांना आर्थिक त्रास देत आहेत. अशा अकॅडमी विना मान्यता असून, त्यांचा अभ्यासक्रम आणि शिक्षणाच्या पद्धतीवर सरकारने ठरवलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचे गंभीर प्रकरण आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडते आणि वर्गांमध्ये भेदभाव निर्माण होतो. विशेषतः पहिली ते दहावीत शिकणाऱ्या मुलांना मूलभूत गोष्टी समजत नसतानाही, त्यांच्यावर अकॅडमींची सक्ती केली जाते व अधिक शुल्क आकरले जाते असल्याचा आरोप सनी काकडे यांनी केला आहे.
शाळांमध्ये व शिक्षकांमध्ये शिकविण्याच्या पद्धतीत कमतरता असल्यास त्या शिक्षकांना हकालपट्टी करण्याऐवजी अकॅडमी चालवण्याचा धंदा सुरू ठेवला जात आहे. कामगार संघर्ष संघटना या प्रकाराच्या अकॅडमींचा प्रखर विरोध करत असून, स्थानिक गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून त्वरित कारवाईची मागणी करत असल्याचे काकडे यांनी म्हटले असून भारत सरकारने जाहीर केलेल्या कोचिंग क्लासेस नियमावलीचे पालन फलटणमधील अकॅडमीमध्ये होत नसल्यामुळे शासनाने त्वरित या अकॅडमी बंद करण्याचे आदेश द्यावेत अशी संघटनेची मागणी असल्याचे शेवटी सनी काकडे यांनी म्हटले आहे.