फलटण - सचिन मोरे
उन्हामुळे घामेजून अंगाची लाही - लाही होते. त्यावेळी थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते आणि आपसूकच आठवते ती पाणपोई. रंक असो वा राव पाणपोईवर पाणी पिण्यासाठी सारेजण येतात. फलटणच्या चौकाचौकातील गणेशोत्सव मंडळे, मित्रमंडळे उन्हाळा सुरू झाला पाणपोई मोठ्या हौसने थाटत. मोठे - मोठे रांजण स्वच्छ पाण्याने भरून वाटसरूंची तहान शमवण्यासाठी सज्ज असायचे. अशा वेळी जर त्याला थंडगार पाणी मिळाले तर ते त्याला अमृताहून गोड लागते. त्याला त्या पाण्याच्या घोटाचे महत्त्व कळते. पाणी पिऊन तो तृप्त होतो, आणि ज्याने त्याच्यासाठी थंडगार पाण्याची सोय केली त्याला धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो.मात्र आज हे चित्र दिसेनासे झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होतानाचे चित्र आहे. एकीकडे उष्णतेचा पारा चाळीशी पार गेला असतांना पाण्याचे दुर्भिक्ष दिसू लागले आहे.तर अनेक ठिकाणी उष्माघाताचे बळी गेल्याचे बातम्या रोजच ऐकू येत आहेत. फलटणच्या ग्रामीम भागातून अनेक लोक कामानिमित्त फलटणला येत असतात. तर शालेय परीक्षेचा काळ असल्यामुळे ग्रामीण भागातील विध्यार्थी - विध्यार्थीनी सकाळ पासूनच शहरात दाखल होत आहेत. सध्या दुष्काळाच्या कात्रीत सापडलेला शेतकरी, व्यावसायिक यांना अगोदरच आर्थिक कोंडी झाली असताना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. तर शहरात तहान भागविण्यासाठी पाण्याची थंडगार बाटली विकत घेण्यासाठी २० रुपये मोजावे लागत आहेत जे अनेकांसाठी अशक्य आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
फलटण शहरातील पाणपोईचा सेवा-भावी उपक्रम पुन्हा सुरु व्हावा आणि घशाल पडलेल्यांना कोरड दूर करताना थंडगार पाणी मिळावे व वाटसरूना हायसे वाटावे अशी अपेक्षा केली जात आहे.