फलटण प्रतिनिधी :
फलटण शहारा नाजिक असलेल्या जाधववाडी (फ) गावठाण हद्दीत मोकाट जनावरे व भटक्या गाढवांनी उच्छाद मांडला असून, भटक्या जनावरांनी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. भटक्या जनावरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
जाधववाडी (फ) परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. या वाढत्या नागरीकरणाबरोबरच हद्दीत मोकाट जनावरे व भटक्या गाढवांचा प्रश्न आहे. गावात कचर्याच्या ढिगार्यांच्या आसपास मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. या कचर्यात खाणे शोधण्यासाठी टोळीने भटक्या गाई, बैल व गाढवांची भटकंती सुरू असते. रस्त्यावरून जाणार्या ग्रामस्थांना, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, लहान मुले तसेच दुचाकीचालक यांना या जनावरांचा त्रास नित्याचाच झाला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
भटक्या जनावरांच्या विष्ठेच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रासले असून, परिसरात दिवसेंदिवस भटक्या आणि मोकाट जनावरांची समस्या बिकट होत चालली आहे.
परिसरातील मानवी वस्त्यांमध्ये या भटक्या जनावरांनी दहशत माजवली आहे. सकाळी शाळेत व ट्यूशनला जाणार्या विद्यार्थ्यांमध्ये कळपाने फिरणार्या या जनावरांनी दहशत निर्माण केली असून, बाहेर पडताना या मुलांना धडकी भरते. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.