डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांचा कुलदैवत खंडोबा हा महाग्रंथ म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी साहित्याला लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे भारतीय विद्येचे अभ्यासक म्हणतात तर हा ग्रंथराज म्हणजे ध्येय, ध्यास आणि अभ्यास यांचा अनोखा संगम तर प्रज्ञा, प्रतिभा आणि प्रयत्न यांचे एकात्म रुप असल्याचे नमूद करीत विविध वाङमय प्रकारातील खंडोबा दैवताचे पडलेले श्रद्धाशील प्रतिबिंब हे या महाग्रंथाचे खास वैशिष्ठ्य म्हणावे लागेल यातून इतिहास, लोकश्रद्धा, लोकसंस्कृती आणि लोकधारणा यांचे सखोल आणि व्यासंगपूर्ण दर्शन घडत आहे - लेखक : डॉ.द.ता.भोसले
दुधेबावी (फलटण ) येथील सामान्य शेतकरी मेंढपाळ कुटुंबात जन्मलेले आणि आपल्या कर्तृत्वाने साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळविलेले संशोधक, श्री कुलदैवत खंडोबा, कृष्णाकाठचे भयपर्व आणि काही अप्रकाशित साहित्य कृतींचे लेखक, लोकसाहित्यिक, दुधेबावी भूषण, जय मल्हार मालिकेचे तज्ञ सल्लागार डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांचे वयाच्या ५५ व्या वर्षी नुकतेच पुण्यात हृदयविकाराने अकाली निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जन्मगावी दुधेबावी, ता. फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुधेबावी व पंचक्रोशी सह पुण्यातील काही साहित्य प्रेमी उपस्थित होते.
दुधेबाबी, ता. फलटण जन्मभूमी आणि विद्धेचे माहेरघर पुणे कर्मभूमी लाभलेल्या शांत, संयमी, साहित्यिक डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून कुलदैवत खंडोबा हा संशोधनपर अलौकिक ग्रंथ लिहिताना त्याबाबत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या खंडोबा मंदिरांना भेटी देवून, तेथील प्रथा, परंपरा, समाजमन याचा अभ्यास करुन कुलदैवत खंडोबा या महाग्रंथाचे लिखाण केले.
डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांचा हा महाग्रंथ म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी साहित्याला लाभलेली अमूल्य देणगी असल्याचे भारतीय विद्येचे अभ्यासक म्हणतात तर हा ग्रंथराज म्हणजे ध्येय, ध्यास आणि अभ्यास यांचा अनोखा संगम तर प्रज्ञा, प्रतिभा आणि प्रयत्न यांचे एकात्म रुप असल्याचे नमूद करीत विविध वाङमय प्रकारातील खंडोबा दैवताचे पडलेले श्रद्धाशील प्रतिबिंब हे या महाग्रंथाचे खास वैशिष्ठ्य म्हणावे लागेल यातून इतिहास, लोकश्रद्धा, लोकसंस्कृती आणि लोकधारणा यांचे सखोल आणि व्यासंगपूर्ण दर्शन घडत असल्याचे पंढरपूर येथील व्यासंगी लेखक डॉ. द. ता. भोसले यांनी नमूद केले आहे.
धर्म साहित्याचे पुणे येथील अभ्यासक स्व. डॉ. रामचंद्र देखणे म्हणतात, खंडोबाविषयी एवढी समग्र माहिती देणारा ग्रंथ आढळणे दुरापास्त आहे. ते एकीकडे खंडोबाचे संशोधन आहे, दुसरीकडे त्याचे शब्द जागरण आहे, तर तिसरीकडे त्याचे गुण संकीर्तन आणि लीला संकीर्तन आहे.
अशा प्रकारे अलौकिक लेखन करणारे शांत संयमी साहित्यिक डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांचे अकाली जाणे साहित्य क्षेत्रातील खूप मोठी हानी असल्याचे नमूद करीत आपल्या थापणूक कथा संग्रहाला त्यांची प्रस्तावना लाभली. त्यांच्याशी सतत साहित्यिक चर्चा सुरु असायची असे प्रा.रविंद्र कोकरे यांनी सांगितले.
साहित्य अन् साहित्य हेच विश्व बनलेल्या डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांच्या विषयी लक्ष्मणराव हाके (सांगोला) यांनी शेत शिवाराचे राखणदार असलेल्या बा वर्गातील देव देवतांविषयी लिहिलेली व अन्य काही पुस्तके प्रकाशित राहिल्याचे सांगितले आहे.
डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन संशोधन मार्ग स्विकारला. भारत भरातील खंडोबा मंदिरे, आख्यायिका यासाठी तब्बल २० वर्षे भ्रमंती करुन ग्रंथ लेखन करण्यात स्वतःच जगणं, आपला संसार हे सारं राहूनच गेल. साहित्याच्या जडण घडणीत स्व विसरुन समाज देणं देणारा शिलेदार हरपला.
नुकतीच कृष्णाकाठचे भयपर्व ही कांदबरी पूर्ण होऊन ती अवलोकनार्थ पाठविली असताना त्यावर चर्चा होऊन प्रकाशन करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. जय मल्हार, दख्खनचा राजा जोतिबा या मालिकांचे तज्ञ सल्लागार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्या वाचस्पती पदवी लाभलेले डॉ. ठोंबरे यांच्या अकस्मात जाण्याने मौलिक संशोधन, सखोल चिंतन, मार्मिक चर्चा ही गुणवैशिष्टये हरपली. साहित्य शारदेची सेवा करीत असताना संसारिक भान राहिलेच नाही. साहित्य क्षेत्रात त्यांच्या संशोधनाने केलेली कामगिरी चिरंतनच राहणार. त्याचा साहित्य वसा अन् वारसा जपणे हीच खरी आदरांजली ठरेल असे मत लक्ष्मणराव हाके यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान संशोधक स्व. डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवार दि. ९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दुधेबावी ग्रामपंचायत सभागृह, दुधेबावी येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.