फलटण प्रतिनिधी : ४ जुलै २०२३
फलटण तालुक्यातील साखरवाडी नजीक असलेल्या खराडेवाडी गावात जवळपास हजार लोकसंख्या असलेली बौद्ध वस्ती आहे. या बौद्धवस्तीला अद्यापही जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही. येथील बौद्ध समाजातील लोक गावातील लोकांच्या खाजगी रस्त्यांचा वापर करतात. परंतू हे रस्तेही आता बंद करण्यात आले असून बौद्ध वस्तीतील लोकांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी, वृद्ध, महिला व रुग्णांना रोज कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांनी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच तहसीलदार यांच्याकडे रस्त्यासाठी मागणी केली. परंतू त्यांच्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. हे प्रकरण अतिशय गंभीर असून बौद्ध वस्तीत जाण्या-येण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत आहे.
दिनांक ४ जुलै २०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खराडेवाडी येथील बौद्ध वस्तीला भेट देत प्रत्यक्ष परिस्थिती पाहत स्थानिक नागरिकांची चर्चा केली. व सरपंच, उपसरपंच यांचीही भेट घेत कायम स्वरूपी रस्ता मिळावा यासंबंधी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्याची प्राथमिक मागणी केलेली आहे. येत्या ७ दिवसांत बौद्ध वस्तीला अधिकृत रस्ता मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला असल्याची माहिती वंचितचे नेते सुभाष गायकवाड यांनी दिली.
यावेळी फलटण व सातारा जिल्ह्याचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी नारायण पवार ,अमित गायकवाड, सुभाष गायकवाड, सपनाताई भोसले, चित्राताई गायकवाड, व सामाजिक कार्यकर्ते अक्षय साळवे उपस्थित होते.