फलटण -
फलटण शहरातील एखादा आपण फार जागरूक असल्याचा आव आणणार आणि फक्त गणेशोत्सवामध्ये डीजेवर बंदी घालण्यासाठी गरळ ओकणार असेल तर फलटण शहरातील गणेश मंडळे हे खपवून घेणार नाहीत. गणेशाची प्रतिष्ठापना होत असताना डीजेवर पोलीस प्रशासन कारवाई करणार असतील तर आम्ही सर्व गणेश मंडळे अशा लोकांचा व प्रशासनाचा जाहिर निषेध करणार असल्याचा इशारा फलटण नगर परिषदेचे मा. जेष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला आहे.
लग्न, मुंजी, सुपारी साखरपुडा आणि अनेक जयंती उत्सव या सर्वांना डीजे चालू असतो त्यावेळी त्रास होत नाही का असा सवाल उपस्थित करीत वर्षाचे 365 दिवसा पैकी 355 दिवस डीजे चालतो मग फक्त गणेशोत्सवाचे 10 दिवसच नागरिकांना त्रास कसा होतो. डीजे चे आवाजावर मर्यादा असलीच पाहिजे याच्याशी आपण सहमत असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.
गणेश मंडळांचे उत्सवावर जर निर्बंध येणार असतील तर सर्व गणेश मंडळांनी आवाज उठवावा लागेल नाही तर काही दिवसांनी गणेश उत्सव बंद करावा लागेल अशी भीती व्यक्त करतानाच लवकरच याच्या विरोधात सर्व मंडळांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे अशोकराव जाधव यांनी म्हटले आहे.