म्हसवड शहरातील कोरोनाबाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. ‘जनता कर्फ्यू’चे तीनतेरा वाजल्यामुळे म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
म्हसवड : म्हसवड शहरातील कोरोनाबाधित रस्त्यावर फिरत असल्याने कोरोना वाढत आहे. या लोकांच्या वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आरपीआय नेते किशोर सोनवणे यांनी केली आहे. ‘जनता कर्फ्यू’चे तीनतेरा वाजल्यामुळे म्हसवड पालिका व पोलीस यंत्रणेत ताळमेळ जुळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शासनाच्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
माण तालुक्यामध्ये कोरोना प्रभाव वाढला आहे. म्हसवड शहरात कोरोनाची संख्या अधिक वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासन पूर्णपणे हतबल झालेले आहे. मसवड शहरामध्ये 14 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ करण्यात आलेला आहे. माण तालुक्याचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी म्हसवडवासियांची बैठक घेऊन ‘जनता कर्फ्यू’चा निर्णय घेतला होता.
मात्र, प्रशासनाने लोकांच्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे आता कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. म्हसवड शहरामध्ये नुकतेच चार रुग्णांचे कोरोनामुळे निधन झालेले आहे. होम क्वारंटाईन लोक घरात न बसता फिरत व दुकाने उघडून बसत आहेत. यामुळे संख्या वाढताना दिसत आहे. यामध्ये शहरातील वाढणार्या कोरोनामुळे अधिक धोका निर्माण झाला आहे.
म्हसवड शहरात दररोज रुग्ण वाढत आहेत. मात्र, म्हसवड नगरपालिकेने वाड्या-वस्त्यांवर निर्जंतुक औषधे फवारणी अद्याप केली नाही. ‘जनता कर्फ्यू’ करण्यापूर्वी झालेल्या बैठकीत प्रांताधिकार्यांनी शहरातील संशयित रुग्णांची तपासणी वैद्यकीय कर्मचार्यांच्या मार्फत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, संशयित रुग्ण वाढले असूनही अद्यापही तपासणी करण्यात आली नाही. यामुळे रुग्ण वाढत आहेत. कुटुंबातील एक व्यक्ती बाधित असेल तर इतरांची तपासणी करण्यात येत नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून फलकही लावले जात नाहीत. रुग्णांना प्रतिबंध करण्यात येत नाही. हे बाधित रुग्ण गावभर फिरत आहेत.
पोलीस बंदोबस्त वाढवावा
शहरातील पोलीस यंत्रणेने सगळा भार होमगार्डवर सोपवला आहे. शहरात कुठे ही तपासणी करण्यात येत नाही. बसस्थानक परिसरात एक शिपाई व एक होमगार्ड बंदोबस्त करत आहेत. पोलिसांनी मोकाट फिरणार्या लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. जे व्यापारी कोरोना तपासणी करत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी.
पूर्ण लॉकडाऊन गरजेचे
कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता आता पूर्ण लॉकडाऊन गरजेचे झाले आहे. शहरातील सर्व व्यवहार बंद करून केवळ वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शहरातील मुख्य बाजारात अद्यापही काही व्यापारी दुकाने बंद करून मागच्या दारातून विक्री करत आहेत. यामुळे रुग्ण वाढत आहेत. उलट अनेक व्यापारी बाधित झाले आहेत. शहरातील लोकांनी आता अधिक काळजी घेतली तर कोरोना आटोक्यात येईल, अन्यथा शहरात अत्यंत वाईट स्थिती होणार आहे.
व्हेंटिलेटरची व्यवस्था करावी...
शहरातील दवाखान्यात रुग्ण वाढत असून, म्हसवड येथील कोरोना सेंटर येथे रुग्ण वाढल्याने बेड उपलब्ध होत नाहीत यामुळे रुग्णांना बाहेरच्या रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. म्हसवड येथे लोकवर्गणीतून सुरू केलेल्या कोरोना सेंटरला लोकांनी औषधे मोफत दिली आहेत. मात्र, शासनाने या सेंटरला व्हेंटिलेटरसह आवश्यक सुविधा द्यावात, अशी मागणी करण्यात येत आहे.