आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 177 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने बुधवार, दि.17 मे 2023 रोजी सकाळी 10:00 वा. पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन : विजय मांडके
फलटण प्रतिनिधी :
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 177 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने बुधवार, दि.17 मे 2023 रोजी सकाळी 10:00 वा. पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा अभिवादन कार्यक्रम देवगड येथील प्राध्यापक राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली व फलटण येथील कवी ताराचंद्र आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींच्या ‘काव्यमैफीली’चे ही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देताना सांगण्यात आले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे साहित्यातील कार्य व योगदान व त्यांच्या ‘दर्पण’ या वृत्तपत्रातून प्रकाशित काव्यरचनेचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या या कार्याला अभिवादन म्हणून दि.17 मे रोजी पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवींच्या काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या काव्यमैफिलीस उपस्थित राहून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कवींनी आपली एक काव्यरचना सादर करून बाळशास्त्रींना अभिवादन करावे. उपस्थित कवींना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. काव्यरचना सादर करताना कविता कोणाच्याही भावना दुखावणारी अथवा कोणत्याही महान व्यक्तीवर टीका करणारी नसावी याची दक्षता कवींनी घ्यावी. तसेच कविता सादर करण्याकरिता नाव नोंदणी आवश्यक असून यासाठी कवींनी तळेरे (जि.सिंधुदुर्ग) येथील पत्रकार व प्रसिद्ध पत्र संग्राहक निकेत पावसकर (मोबा.98609 27199) व संस्थेचे विश्वस्त अमर शेंडे (मोबा.9922778386) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या अभिवादन कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक तसेच वृत्तपत्रप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने करण्यात आले आहे.