आज देश स्वातंत्र्याचा ७६ वर्धापन दिन देशभर मोठया उत्साहात साजरा होत असताना फलटणच्या भर बाजार पेठेत आणि देशातील स्त्रियांच्या शिक्षणाची कवाडे जांनी उघडली त्या महात्मा जोतिबा फुले यांच्याच पुतळ्या समोर एक बारा-तेरा वर्षाची चिमुकली आपल्यासह कुटुंबाची पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत रस्त्यावर खेळ करीत होती. देश महासत्ता बनणार वगैरे हाकाटी पिटली जात असताना अगदी मूलभूत प्रश्न मात्र सोडवलेच गेले नाहीत हेच या ठिकाणी अधोरेखित होत आहे असेच खेदाने नमूद करावेसे वाटते आहे.
माणसाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी या सारख्या समस्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही,असं दिसतंय, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात "सांगा कसं जगायचं?" हा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अर्थात सर्वसामान्य जनतेची अवस्था पाहील्यावर ही जनता कण्हत कण्हत आणि आपलं रड'गाणं' गातच जगत आहे हे वास्तव आहे. मायबाप सरकार तर कसं जगायचं ते तुम्हीच ठरवा असंच सांगत आहे हे ही स्पष्टपणे दिसून येत आहे, त्यामुळे वीस तीस वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकरांच्या या काव्यपंक्ती आजही तितक्याच तंतोतंत लागू पडतात असे चित्र दिसत आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या देशातील नागरिकांच्या मुलभूत गरजा असून त्या सरकारने अग्रक्रमाने सोडवल्या पाहिजेत.मात्र या मुलभूत गरजा अजूनही आपल्या मायबाप सरकारला सोडवता आलेल्या नाहीत. या देशातील अनेक कुटुंबांना एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. इतकंच नव्हे तर अनेक शहरांमध्ये फेरफटका मारला तर फूटपाथवर राहून जीवन जगणांऱ्यांची संख्या किती मोठी आहे, हे दिसून येते, यापैकी अनेकांना लज्जा रक्षणासाठी धड वस्त्रें ही मिळत नाहीत, यांचाच अर्थ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आजही या देशातील सरकार पुर्णपणे भागवू शकत नाही. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वसामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते.ही बाब निश्चितच गंभीर आहे,मात्र याची दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही असे दिसते.
येणाऱ्या प्रत्येक दिवशी नवनवीन समस्या निर्माण होत आहेत, त्यातच महागाई गगनाला भिडल्या आहे.महागाईचा वणवा भडकला आहे, या वणव्यात सामान्य माणूस भरडला जात आहे. त्याची आर्थिक व मानसिक घुसमट होत आहे. बाजारात वाढलेल्या बेसुमार दरवाढीने तो भांबावून गेला आहे, त्याचे आर्थिक नियोजन पुर्णपणे कोलमडून पडले आहे.असेल त्या भावाने जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना त्याची अक्षरशः कुतरओढ होते आहे. दैनंदिन जीवनातील त्यांचे हे हाल दररोजचेच झाले आहे. श्रीमंतांना जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती किती ही प्रमाणात वाढल्या तरी त्याचा परिणाम त्यांच्या रहाणीमानावर होत नाही, मात्र सर्वसामान्य माणूस पुरता खचून, पिचून व गांगरून जातो आहे. रोजच्या घरगुती गॅस सिलिंडरचा दर एक हजार रुपयांच्या वर गेला आहे, त्यामुळे गॅसच्या ऐवजी चूल पेटवावी काय असा विचार ते करु लागले आहेत, त्यातही सरपण व जळावू लाकडाच्या किंमतीत ही वाढ झाली आहे.काहीही झाले तरी रोजचा स्वयंपाक करताना डोळ्यासमोर महागाईचा महाकाय राक्षस उभा रहातोच.
सर्वसामान्य माणसाला आपल्या रोजीरोटीला मुकावे लागले आहे.अनेकांना दैनंदिन जीवनात कसं जगायचं हा प्रश्न भेडसावत आहे. आरोग्याचा प्रश्न ही जटील झाला. औषधांच्या किंमतीत बेसुमार वाढ झाली. खाजगी व सरकारी दवाखान्यात वैद्यकीय उपचार घेणे अनेकांना परवडणारे राहिले नाही. एकुण वैद्यकीय उपचार महाग झाले आहेत. त्यामुळे अनेकजणांना वैद्यकीय उपचाराऐवजी स्वतः चे प्राण गमवावे लागले आहेत. "सांगा कसं जगायचं?....कण्हत कण्हत की गाणं म्हणत..." या प्रश्नाचे उत्तर "तुम्हीच ठरवा!"