फलटण प्रतिनिधी : 12 ऑगस्ट धैर्य टाईम्स
ज्येष्ठ साहित्यिक व कवी नामदेव धोंडो महानोर व महात्मा जोतिबा फुले यांच्यावर विपुल लेखन करणारे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. हरी नरके या दोघांचे नुकतेच निधन झाले आहे.या दोघांच्या निधनामुळे श्रद्धांजली कार्यक्रम बारामती (पुणे) येथे रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित केल्याची असल्याची माहिती ग्रामीण कथाकार व प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे व सामाजिक कार्यकर्ते माधव कोकरे यांनी धैर्य टाईम्सला दिली.
आपल्या तरल काव्याच्या जोरावर काव्यप्रेमी मराठी वाचकांच्या मनात ना. धों. महानोर यांनी हक्काचं स्थान प्राप्त केलं होतं. महानोर यांनी काव्यसंग्रहांबरोबरच अनेक चित्रपटांसाठीही गीते लिहिली. त्यांच्या या गीतांना त्यांच्या कवितांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ना. धों. महानोर यांचे अनेक कवितासंग्रह वाचकांच्या विशेष पसंतीस उतरले. त्यात अजिंठा या दीर्घ काव्यसंग्रहाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता असे त्यांचे कवितासंग्र लोकप्रिय ठरले. यासह गपसप, गावातल्या गोष्टी हे कथासंग्रहदेखील वाचकांच्या पसंतीस उतरले. १६ सप्टेंबर १९४२ मध्ये जन्मलेल्या ना.धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला आहे.
महात्मा जोतिबा फुले यांच्यावर विपुल लेखन करणारे, सुप्रसिद्ध लेखक प्रा. हरी नरके यांनी पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे अध्यासन प्राध्यापक म्हणून काम पाहिले होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं. मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलुगू यांप्रमाणेच एक अभिजात भारतीय भाषा आहे हे सिद्ध करण्यासाठी नेमलेल्या रंगनाथ पठारे समितीच्या अहवालात प्रमुख समन्वयक म्हणून प्रा. हरी नरके यांनी योगदान दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने 'समग्र महात्मा फुले' नावाचा एक हजार पानाचा ग्रंथ अद्ययावत करून प्रकाशित केला. त्याचे हरी नरके संपादक होते. डॉ आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने २६ खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले होते. महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन आणि महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा ही दोन पुस्तके त्यांची लोकप्रिय होती.
अशा या दोन महान विभूतींना श्रद्धांजली म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम रविवार दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 3 वाजता फ्लॅट नं 13 युनियन बँकेच्यावर भिगवण रोड, मल्हार क्लब कार्यालय, बारामती, जि. पुणे येथे आयोजित करण्यात आला असून फलटण, बारामती, इंदापूर,दौंड,भागातील साहित्यप्रेमी मंडळींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.