मुंबई -
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.