गेली तीस वर्षाच्या राजकीय साम्राज्याला अखेर धक्का बसला. फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) पक्षाचे महायु्तीचे उमेदवार सचिन पाटील यांनी विजय मिळवीला असून रामराजेंना फलटणमध्ये मोठा धक्का बसला आहे. सलग 30 वर्ष विधानसभा निवडणूकीत सलग विजयी मिळवणारे राजेगटाला फलटणच्या मतदारांनी नाकारले असून भाजपाचे मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वर विश्वास दाखवीत सचिन पाटील यांना 17046 मतांनी विजयी करीत फलटणला नवा आमदार दिला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दीपक चव्हाण यांचा 17046 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. फलटण तालुक्यात 30 वर्षांनी राजे गटाच्या हातून विधानसभेची सत्ता गेली आहे. माजी खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा नेतृत्वाखाली खासदार गटाने परिवर्तन घडवित लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला आहे. सलग चार वेळा आमदार निवडून देण्याचा योग यावेळी सुद्धा फलटणकरांनी येऊ दिलेला नाही.
फलटण - कोरेगाव (अ. जा.) विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व दोन्ही नाईक निंबाळकर घराण्याची प्रतिष्ठेची झालेली होती. गेली तीस वर्ष फलटण तालुक्यावर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता होती मात्र या विधानसभा निवडणुकीत या सत्तेला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी छेद देत त्यांचे कट्टर समर्थक सचिन पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आणलेले आहे.
आज सकाळी येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन पाटील यांनी घेतलेली आघाडी आमदार दीपक चव्हाण यांना रोखता आली नाही ही आघाडी हळूहळू सचिन पाटील यांनी वाढवत नेली. जस जसी आघाडी वाढू लागली तसतसे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला कार्यकर्त्यांनी फलटण शहरात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी केली तसेच गुलालांची उधळण करीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
या निवडणुकीमध्ये निरा देवघर, पाणी प्रश्न,कमिन्स कंपनीमधील कामगारांचा पगाराचा मुद्दा, श्रीराम साखर कारखाना, सहकारी दूध पुरवठा संघ, सहकारी खरेदी विक्री संघ, साखरवाडी साखर कारखाना, फलटणची बारामतीशी केलेली तुलना,रस्ते ,आरोग्य हे प्रश्न माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रचारात मांडून जनतेचा कौल मागितला होता. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा पण मांडला होता. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा प्रभावी प्रचार खासदार गटाने केला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आरोपांना राजेगटाकडून प्रभावी उत्तर देणे जमले नाही.सारासार सर्व गोष्टींचा विचार करून जनतेने आपला कौल दिला. फलटण तालुक्याच्या इतिहासात आत्तापर्यंत तीन वेळा आमदार केल्यानंतर चौथ्यांदा आमदार करण्याची संधी फलटणकरांनी कोणालाही दिलेली नाही. चौथ्यांदा आमदारकी निवडणुकीत उतरलेले दीपक चव्हाण यांना त्यामुळे पराभवाचा झटका बसला आहे. सचिन पाटील यांना 1,19287,दीपक चव्हाण यांना 1,02247 मते मिळवत 17046 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
- ठळक...
- एक निर्धार बौद्ध आमदार ही घोषणादेत संविधान समर्थन समितीने शेतकरी संघटनेच्या तिकिटावर प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र बौद्ध समाजाच्या मतदारांनी याकडे पाठ फिरवल्याचे आकडेवाडीवरून स्पष्ट झाले.
- सचिन पाटील यांच्या विजयानंतर आमदार जयकुमार गोरे फलटणला विजयी मिरवणुकीत सामील झाले.
- राष्ट्रीय समाज पक्षाला या निवडणूकीतही आपली छाप पाडता आली नाही.
- निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मतमोजणी करीता उत्कृष्ट नियोजन केले होते. तर पत्रकारांसाठी विशेष शामियाना उभारण्यात आला होता. चहा नाष्टा व दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.
- उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस बंदोबस्त चोख बजावण्यात आला.
- सचिन पाटील यांच्या विजयानंतर फलटण शहरातून फटाक्यांची आतिषबाजी व गुलाबांची उधळून करीत विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजय सभेचा विजय करण्यात आले होते.
- सचिन पाटील यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच घेतलेले मताधिक्य अंतिम मोजणी पर्यंत कायमच राहिले.
- श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे 1995, 2000 व 2004 साली सलग 3 वेळा फलटण मधून विधानसभेवर निवडून गेले होते.
- फलटण - कोरेगाव (अ. जा.) हा विधानसभा मतदार संघ निर्मिती नंतर 2009, 2014 व 2019 असे सलग तीन वेळा दिपक चव्हाण निवडून गेले होते.
- 1995 ला रामराजे यांना आमदार करण्यात मा. खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा मोठा वाटा होता. तर रामराजे यांची सत्ता परिवर्तणात त्यांचे सुपुत्र मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे किंगमेकर ठरले.
- मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या लोकसभेला पराभव करण्यासाठी राजे कुटुंब आघाडीवर होते. मात्र रणजितसिंह यांनी पुन्हा डावपेव आखात मोठा विजय मिळवीला.