सातारा :
ढोल ताशांचा निरंतर गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, रोमांच उभा करणारा तुताऱ्या, झांजांचा आवाज आणि हेलिकॉप्टरमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी , शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली. पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले.
भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करुन शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच कांचन सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ढोल, तुताऱ्या, लेझीम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला.
आई भवानीची आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरु झाली. पोलीस अधीक्षक, अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, दरे, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला.
पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन करण्यात आले. यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज....,' या ललकारींने, शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारुन गेले होते. मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्यासमोरील चबुतऱ्यावरील भगव्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. शाहीर सुरज जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला.
छावा युवा मंचचे अध्यक्ष उदय यादव यांनी लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी, अग्निचक्र, गनिमीकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे-पाटील, महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक शबनम मुजावर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक, विद्यार्थी- विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.