फलटण प्रतिनिधी : फलटणच्या विकासाबाबत आणि इथल्या सहकारी संस्थांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याने त्यांनी आरोप केले तथापि ते सर्व आरोप निराधार व चुकीचे असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज येथील छ. शिवाजी महाराज चौकात प्रचार सांगता सभा झाली, त्यावेळी त्यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दिपकराव चव्हाण यांचे नेतृत्वावर आणि इथल्या विकास प्रक्रियेवर, सहकारी संस्थांवर जोरदार टीका केली, त्यानंतर गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
इथली एकही सहकारी संस्था बंद नसल्याचे सांगताना श्रीराम सहकारी साखर कारखाना शासन मान्यतेने श्रीराम व जवाहर या २ सहकारी संस्थांच्या भागीदारी संस्थेमार्फत चालविण्यात येत असून तेथे श्रीरामला किती पैसे मिळाले यापेक्षा अवसायनात काढण्यायोग्य असलेला हा कारखाना पुन्हा उभा करुन ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना दिलासा देण्याबरोबर ऊसाला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले, त्यासाठी केवळ १८०० मे. टन गाळप क्षमता आता प्रती दिन ५ हजार मे. टन करण्यात आली असून आगामी वर्षभरात ती १० हजार मे. टन करण्याचा प्रयत्न आहे, वाढत्या ऊस क्षेत्राच्या गाळपाचा प्रश्न त्यातून सोडविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
या संपूर्ण प्रक्रियेत गाळप क्षमता वाढीसाठी उभारण्यात येणाऱ्या मशिनरीसाठी होणारा संपूर्ण खर्च श्रीराम जवाहर या भागीदारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, मात्र करार संपल्यानंतर सुमारे १५०/२०० कोटी रुपये गुंतवणुकीची ही संपूर्ण मशिनरी श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची होणार असल्याचे यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
येथे सी. बी. एस. सी. आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची उत्तम सुविधा फलटण एज्युकेशन सोसायटी सह अन्य शिक्षण संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध असून असंख्य मुले तेथे गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेत आहेत, फलटण एज्युकेशन सोसायटीने माजी आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाने उत्तम खेळाचे मैदान उभारले असून तेथे हॉकी, फुटबॉल, खो - खो वगैरे उत्कृष्ट क्रीडांगणे आहेत, हॉकी, फुटबॉल, आर्चरी मध्ये अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू येथे निर्माण झाले आहेत.
इथल्या ३ मुली हॉकी राष्ट्रीय पातळीवर उत्तम खेळल्या असून त्यांनी सुवर्ण पदके मिळविली असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
गोविंदचे कसलेही सांडपाणी ओढ्यात अथवा नीरा नदीत सोडले जात नाही, आम्ही उत्तम इटीपी प्लांट उभारला असून त्याचे प्रक्रिया केलेले पाणी शेतीला वापरता येईल इतके उत्तम आहे, आम्ही ते बागेतील फुल झाडे, गाड्या धुण्यासाठी वापरतो आणि इटीपी प्लांट शेजारी बागेत बसून चहा कॉफी पिलात तरी त्याचा कसलाही वास येत नाही इतका दर्जेदार हा प्लांट असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
कमिन्स ही मल्टी नॅशनल कंपनी असून ती अशा प्रकारे ठेकेदारामार्फत नव्हे स्वतःच्या नियंत्रणात कामगारांना नियमानुसार वेतन ठेकेदारामार्फत देत असताना सर्व व्यवहार हा बँकेच्या माध्यमातून होत असल्याने ठेकेदाराला केवळ ८८० रुपये मिळतात असा खुलासा करताना या संपूर्ण व्यवहारात १ रुपया जरी आपण, श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे किंवा आमच्या कुटुंबाकडे येत असल्याचे दाखवून दिले तर आपण राजकारण सोडून देवू पण हे सिद्ध करता आले नाही तर बिन बुडाचे आरोपांबाबत चुकीची माहिती देणारे राजकारण सोडणार का असा सवालही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित केला.
बारामतीचा विकास झाला तो अनेक वर्षे सत्तेची संधी मिळाल्याने कोट्यावधीचा निधी आणता आला म्हणून झाला वास्तविक त्याच सत्तेच्या माध्यमातून राज्याचे नेतृत्व करताना सर्वच तालुक्यांचा त्याप्रमाणे विकास अपेक्षीत होता पण शेजारच्या इंदापूर, दौंड, फलटणला सुधा ती संधी मिळाली नसल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी निदर्शनास आणून दिले.