सत्ता, संपत्ती, आणि प्रतिष्ठेच्या या बेगडी दुनिये मध्ये माणूस आणि माणुसकीचा अंत होत असताना काही बोटावर मोजण्यासारखे अपवाद वगळले तर गावकुसाबाहेर वाड्यावस्त्यांच्या बाहेर वंचित,शोषित, उपेक्षित समाजाचे दुःख घेऊन जगणाऱ्या या बारा बलुतेदार व अठरा आलूतेदारांमधील काही जातींची स्थिती फारशी सुधारलेली दिसत नाही._
सामान्यपणे पाटील, कुलकर्णी हे सोडून चौगुला, महार, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, न्हावी, सोनार, जोशी, परीट, गुरव आणि कोळी हे प्रामुख्याने 'बारा बलुतेदार'म्हणून प्रसिद्ध आहेत. ज्यांच्यावाचून शेतकऱ्यांचे नडत नाही, पण जे शेतकऱ्यांच्या नैमित्तिक गरजा भागवितात ते अलुतेदार. अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे. यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे, आणि हा इतर मागास वर्ग (ओबीसी)मध्ये मोडतो. अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात. कासार, कोरव, गोंधळी, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भट,भोई,माळी,जंगम, वाजंत्री, शिंपी, सनगर,साळी या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता. याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.
गावगाड्यातील याच वंचित शोषित उपेक्षित समाजातील काही जात समूहांच्या जीवनात आजही अंधकार पसरलेला आहे. हेच मरीआईचे व लक्ष्मी आईचे पोतराज मरीआईचा गाडा घेऊन गावोगावी गुबू गुबू वाजवत अंगावर आसूडाचे (कोरड्याचा) फटके घेत देवीची उपासना करताना दिसतात. ते लोक गावोगावी आपल्या उदरनिर्वासाठी देवीच्या नावाखाली भीक मागण्याचे काम आजही करत आहेत. पूर्वी लोकांची दानत होती. लोक आपल्या दारात आलेल्या प्रत्येकाला सढळ हाताने मदत करायचे. आज मदत करणाऱ्या हातांना रोजगार नाही. शेत जमिनीचे तुकडे झाले. एकत्र कुटुंब पद्धती चे रूपांतर विभक्त कुटुंब पद्धतीत झाले. त्यामुळे प्रत्येक जण मी आणि माझे कुटुंब या पुरता सीमित झाला. या वंचित, शोषित, उपेक्षित समाजाच्या कुटुंबातील एखाद दुसऱ्या कुटुंबातील एखादा शिक्षित माणूस फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन हे अंधश्रद्धेचे जोखड फेकून आज तो स्थिरावला आहे. परंतु आजही गाव गावात नगरांमध्ये हे समूह मरीआईचा गाडा घेऊन दारोदारी आसूडाचे (कोरड्याचे) फटके घेत भिक मागताना दिसत आहेत. मी माझ्या वाढ वडिलांच्या काळात ही लक्ष्मी आईला पोतराज सोडल्याच्या गोष्टी ऐकल्या आहेत. माझे थोरले चुलते दिनकर घोरपडे हेही पोतराज म्हणून त्यांनाही देवीला सोडले होते.
75 वर्षाच्या स्वातंत्र्याचा ढोल वाजवून अमृत बसून साजरा करत असताना आजही या या उपेक्षित, शोषित समाजातील बलुतेदार व अलुतेदार समाजातील काही जातसमुहांच्या वाट्याला हेच जगणे आले आहे. एका बाजूला ग्लोबलायझेशनची भाषा बोलणारे आपण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारे आपण त्यांच्यासाठी काय करू शकू याचा विचार कायम मनाला सतावतो. भ्रष्ट सत्तापीपासू राजकारण्यांकडून अपेक्षा करणे हे पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे. त्यांना या समूहांना या दुःख, दैन्य व दारिद्र्यातून बाहेर काढण्याची मनापासून इच्छा नाही. आज हेच समूह उच्च शिक्षण घेतील. संघटित होतील आणि संघर्ष करायला लागले तर आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल याची त्यांना खात्री आहे. म्हणूनच या समूहांना ते जगूनही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत. आज संपूर्ण देशभर दिव्यांचा प्रकाश उजळलेला असताना, हे पर्व प्रकाशाचे पर्व आहे हे सुरू असताना हे वंचित, शोषित, उपेक्षित समाजातील घटक, ही माणसं आजही दारोदार भीक मागताना आपल्याला दिसत आहे. गेल्या 75 वर्षात हेच का आपण त्यांना दिलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर या समूहाच्या सामाजिक समतेसाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी खूप प्रयत्न केले. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा! हा मूलमंत्र दिला. परंतु याचा खरा अर्थ या समूहांना आजही कळलेला दिसत नाही. त्यामुळे या लोकांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत फारसा बदल झालेला दिसत नाही. पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यासारख्या भटक्या-विमुक्तांच्या न्यायी हक्कांसाठी लढणाऱ्या योद्धांमुळे काही प्रमाणात यात बदल होऊन आज ही कुटुंबे सन्मानाचे जीवन जगायला लागली आहेत. येणाऱ्या तरुण पिढीने याच लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. फटाक्यांची आतिषबाजी, दारी रांगोळी, फराळाचं स्वादिष्ट आहार, दिव्यांची व पणत्यांची संपूर्ण आरास, नवीन कपडे, सुगंधी उठणे यात मश्गुल असणाऱ्या समाजाला या प्रस्थापित व्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांना या माणसांचं दुःख खरच समजेल. हे लोक दोन पावलं उचलून या लोकांच्याकडे मदतीचा हात देतील. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून गेल्या 75 वर्षात आपण काय मिळवलं? एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या लोकांच्या झोपड्यामध्ये प्रकाश कधी आपण देणार आहोत?त्यांची मुलं बाळ चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण कधी घेणार आहेत?का ही मुलं हाच मरीआईचा गाडा डोक्यावर घेऊन सणासुदीला आपल्या दारात झोळी घेऊन भीक मागायला येणार आहेत. आज आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देत आहोत. आग्रहाने फराळाला बोलवत आहोत. यांच्याही जीवनात हे दिवस कधी येतील. जगात विश्वगुरू होण्याचा दावा छाती ठोकून सांगणाऱ्या आपल्या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या चेल्या चपाटयांना त्यांचे दुःख समजेल तेव्हा खऱ्या अर्थाने हे दीपावलीचे प्रकाश पर्व आनंदाने साजरा करण्याचे धाडस आपल्यासारखी संवेदनशील माणसं करू शकतात.
गौतम बुद्ध आपली जन्मभूमी कपिलवस्तू येथे सम्यक संबोधी प्राप्त झाल्या नंतर १८ वर्षांनी परतले.तेव्हा स्थानिक लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी लाखो दिव्यांची आरास केली होती.याच दिवशी आपल्या शिष्यांना अत दीप भव(अप्प दिपो भव)हा संदेश त्यांनी दिला.याचाच अर्थ तुम्हीच तुमचे प्रकाश बना!दिवाळीला अंधकारावर प्रकाशाचा,अज्ञानावर ज्ञानाचा,वाईटावर चांगल्याचा विजय ही मानला जातो.तेव्हा याच उपेक्षित, वंचित व शोषित समूहासाठी आपण सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलून त्यांच्याही झोपड्यांमध्ये प्रकाश घेऊन जाण्याचे काम करूया. आपल्या घासातील एक घास त्यांनाही भरवू या. तेव्हाच हा दीपदानाचा महोत्सव सार्थकी लागला असे आपण म्हणू शकू.
सोमनाथ घोरपडे, सासकल, फलटण