फलटण प्रतिनिधि :
श्रीराम, दूध संघ, बाजार समिती, खरेदी विक्री संघ वगैरे सर्व सहकारी संस्था संचालक मंडळाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे पुन्हा उभ्या करुन सभासदांना योग्य मोबदला देतील इतपत आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याबरोबर मतदार संघातील शेतकरी, कामगार, व्यापारी, तरुण, विद्यार्थी, स्त्रिया, वृध्द वगैरे सर्व समाजघटकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि मतदार संघाचा नियोजन पूर्वक सर्वांगीण विकास अवघ्या ५ वर्षात करण्याची जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त सचिन पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी केले.
फलटण - कोरेगाव विधान सभा मतदार संघात छ. शिवाजी महाराज चौक, फलटण येथे आयोजित विराट प्रचार सांगता सभेत मार्गदर्शन करताना उपमुख्य मंत्री अजित पवार बोलत होते, यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उद्योजक राम निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर, पिंटू तथा नानासाहेब ईवरे, तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम, धनंजय साळुंखे पाटील, श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर, भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजप अध्यात्म आघाडीचे अध्यक्ष अशोकराव जाधव, सुशांत निंबाळकर, चेतन शिंदे, सौ. प्रतिभा शिंदे यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि मतदार बंधू - भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण सन १९९१ पासून आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सन १९९५ पासून राज्य विधी मंडळाच्या माध्यमातून सत्तेत आहोत, बारामती आणि फलटण मतदार संघाचा विकास तुलनेत सारखा व्हायला हवा होता पण फलटण का मागे राहिले असा सवाल करीत इथल्या सहकारी संस्था, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती लोकांनी ज्या विश्वासाने यांच्या ताब्यात दिल्या त्याच विश्वासाने बारामती करांनी आमच्याकडे सोपविल्या आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता सर्वांगीण विकास केला यांना ते जमले नाही तर आम्हाला विचारायचे आम्ही योग्य सल्ला दिला असता आणि दोन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास झाला असता असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
अवघ्या ५ वर्षात सर्व सुधारता येईल
आमचे सोमेश्वर माळेगाव सहकारी साखर कारखाने मोठ्या क्षमतेचे झाले, उपपदार्थ निर्मितीत पुढे गेले यांचा श्रीराम बंद पडला/चालवायला दिला, दोन्ही तालुक्यात त्याच धरणाचे पाणी, दोन्ही तालुक्यात शेतकरी रात्रंदिवस कष्ट करतो मग प्रती टन ५००/६०० रुपये कमी का ?, अन्य सहकारी संस्थांची दुरावस्था, वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य या नागरी सुविधा पुरेशा नाहीत हे सारे बदलून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा अवघ्या ५ वर्षात चित्र बदलून दाखवतो असा विश्वास उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आणि सचिन पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
श्रीराम सभासदांच्या मालकीचा कधी होणार
सन २०२१ मध्ये श्रीराम चालवायला देण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर आला त्यावेळी तत्कालीन सहकार मंत्री व प्रशासनाने कारखाना सक्षम आहे, दायित्व नाही तर किमान २०० रुपये प्रति टन प्रमाणे ५ वर्षांसाठी चालवायला देण्यास सहमती दर्शविली असताना यांनी केवळ ३० रुपये टनाने १५ वर्षे चालवायला दिला, शिवाय घेतलेल्या आगाऊ रकमेपैकी अर्ध्या रकमेवर व्याज देण्याची तरतूद करारात केली, कारखाना मालकीची मोक्याची जमीन विकली, कारखाना चालवायला दिला, व्याजपोटी दरवर्षी १ कोटी देणार मग हा कारखाना सभासदांच्या मालकीचा कधी होणार असा सवाल करीत त्यामध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद केली.
बारामती मध्ये सर्व सुविधा येथे का नाहीत ? नेतृत्व बदला
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून नागरिकांना पुरेशा नागरी सुविधा, शहरात क्रीडांगण, नाट्यगृह, उत्तम प्रशासकीय कार्यालय, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, अगदी महिलांसाठी उत्तम स्वच्छता गृह, महिलांचा योग्य सन्मान आणि त्यांची सुरक्षितता, एस. टी. सारख्या दळण वळणाच्या उत्तम सुविधा आम्ही बारामती तालुक्यात देऊ शकतो ते इथे का नाही असा सवाल करीत इथले नेतृत्व बदलल्याशिवाय ह्या सर्व सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत त्यासाठी सचिन पाटील यांच्या नावासमोरील घड्याळाच्या चिन्हाचे बटण दाबून त्यांना विधान सभेत पाठवा आणि इथल्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपवा ५ वर्षात सर्व उत्तम, दर्जेदार करण्याचे स्पष्ट आश्वासन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विकासाची संधी प्राप्त झाली त्याचा फायदा घ्या
फलटण तालुक्याचा ठप्प झालेला विकास गतिमान करण्याची, सहकारी संस्था पूर्व वैभवाप्रत नेण्याची, शेतीला प्रतिष्ठा मिळण्याची, विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण आणि वृद्धांसह सर्वांना उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा मिळण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला प्राप्त झाली आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी सचिन पाटील यांना बहुमताने विजयी करुन राज्यात पुन्हा येणाऱ्या महायुतीच्या शासनाला साथ करा, फलटणचा चेहरा मोहरा बदलून देतो असे स्पष्ट आश्वासन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
विविध समाज घटकांचा पाठिंबा
माळी समाज व होलार समाज, आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे येथील कार्यकर्ते व दिव्यांग बंधूंनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांना धन्यवाद देत त्यांच्या अन्य मागण्यांसह होलार समाज विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी आणि मुरुम येथे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे उचित स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
संधी मिळताच विकास गतिमान केला, दादांच्या साथीने उर्वरित विकास सुरु
आपण गेली १०/१५ वर्षे फलटण शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असून लोकसभेच्या माध्यमातून संधी मिळताच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना येथे प्रभावी रीतीने राबवून विकास प्रक्रिया गतिमान केली, विशेषतः शहर व ग्रामीण पोलिस ठाणी आणि साखरवाडी पोलिस दूर क्षेत्रासाठी दुमजली प्रशस्त इमारती उभारल्या, जिल्हा न्यायालय, आर टी ओ ऑफिस मंजूर करुन घेऊन प्रत्यक्ष सुरु केले, सिंचन भवन, वारकरी भवन, प्रशासकीय कार्यालय यासाठी दिलेले प्रस्ताव मंजूर असून भविष्यात येथे त्याची उभारणी होणार आहे, लोणंद - फलटण - बारामती या मंजूर रेल्वे मर्गापैकी लोणंद - फलटण रेल्वे मार्ग पूर्ण होऊन त्यावरुन रेल्वे वाहतूक सुरु झाली तर फलटण - बारामती रेल्वे मार्गाचे काम गतीने सुरु आहे, फलटण - पंढरपूर रेल्वे मार्गाला पुन्हा मंजुरी घेतली असून त्याचे सर्वेक्षण सुरु आहे, केंद्र व राज्य शासनाने या मार्गासाठी प्रत्येकी ९०० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत, फलटण - बारामती, फलटण - सातारा या राज्य रस्त्यांची कामे मंजूर करुन घेऊन दोन्ही रस्त्यांची कामे सुरु आहेत, आसू - फलटण - गिरवी - वारुगड या अनेक वर्षे प्रलंबीत रस्त्यासाठी २८५ कोटी रुपये मंजूर असून लवकरच ते काम सुरु होणार असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
औद्योगिक व शहर विकास प्रक्रिया पूर्णत्वास नेणार
नाईकबोमवाडी येथील औद्योगिक वसाहत शासनाने मंजूर केली असून तेथे तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे ६० गावातील १० हजारावर तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, फलटण शहरातील खेळाचे मैदान, शासकीय दवाखाने, बागबगीचे, सार्वजनिक सभागृह, नाट्यगृह, शाळा यासाठी जागा उपलब्ध नाहीत येथील नेतृत्वाने या जागांवरील आरक्षणे उठविल्याने मोठी अडचण झाली आहे, एस. टी. आगार आणि बस स्थानक इमारत उभारणी व बसेसची संख्या वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत या सर्व प्रश्नात लक्ष घालुन त्याची सोडवणूक करण्याची ग्वाही यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
राजमाता अहिल्यादेवी व सुभेदार मल्हारराव होळकर स्मारक उभारणार
फलटण येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि मुरुम येथे सुभेदार मल्हारराव होळकर यांची भव्य स्मारकांची उभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही दोन्ही स्मारके आणि विकासाच्या अन्य योजना आगामी काळात पूर्णत्वास नेण्याची ग्वाही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
१५ वर्षे सतत सत्तेत पण विकास नाही
१५ वर्षे सलग सत्तेत राहुन दिपकराव चव्हाण यांनी मतदार संघातील एक ही प्रश्न सोडविला नाही, तथापि आता त्यांना बदला व आपल्याला संधी द्या दोन दादांच्या माध्यमातून सर्व प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक तर करणारच त्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न विशेषतः शेतमालाला रास्त भाव आणि फलटण शहराचा सर्वांगीण विकास येथील नागरिकांना सर्व नागरी सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर, ॲड. नरसिंह निकम, संदीप चोरमले, संतोष सावंत, सुशांत निंबाळकर, सौ. प्रतिभा शिंदे, विराज खराडे वगैरेंची समयोचीत भाषणे झाली. महानंदचे माजी व्हा. चेअरमन डी. के. पवार यांनी समारोप व आभार मानले, आनंद पवार यांनी सूत्र संचालन केले.
व्यासपीठावर जाण्यापूर्वी अजित पवार यांनी छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन केले. त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, सचिन पाटील, चेतन शिंदे वगैरे उपस्थित होते.