महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का.? या प्रश्नाचे उत्तर शोधले तर आंबेडकरी विचारांच्या राजकीय पक्षाचा इतिहास असे सांगते की, रिपब्लिकन पक्षाचे नेते नेतृत्वासाठी भांडतं बसले. तु अध्यक्ष की, मी अध्यक्ष या साटमारीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, तट निर्माण झाले ते अजुनही वळवळ करतातचं.रिपब्लिकन, रिपब्लिकन एवढाच कंठशोष केला जातो. सत्तेसाठी कुठलाच प्रयोग केला जातं नाही हे वास्तव आहे.
रिपब्लिकन या नावाचा वापर करून रा. सु. गवई यांनी स्वतःच्या सत्तेसाठी ,स्वार्थासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, त्याचे फळ म्हणून त्यांना विधानपरिषदेचे उपसभापती,सभापती , राज्यपाल असे सत्तेचे तुकडे मिळतं गेले. आंबेडकरी समुह होता तसाच सत्तेपासून वंचित राहिला. आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केल्या गेले नाही हा इतिहास आहे. आरोप नाही.
रिपब्लिकन या नावाचा वापर करून रामदास आठवले यांनी स्वतः च्या सत्तेसाठी, स्वार्थापोटी प्रामाणिक प्रयत्न केले त्याचे फळ म्हणून त्यांना खासदारकी,राज्यसभा,समाजकल्याण मंत्री राज्यात आणि केंद्रात असे सत्तेचे तुकडे मिळाले. आंबेडकरी समुह सत्तेपासून वंचित राहीला. हा आरोप नाही घडलेल्या घटनांचा इतिहास आहे.
उत्तरेत कांशीराम यांनी आंबेडकरी समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पक्ष केडर बेस केला. नोकरदार वर्गाने आर्थिक रसद पुरविली त्याचे फळ म्हणून मायावती चार वेळा उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.
आंबेडकरी समूहासाठी सत्ता हवी असेल तर महाराष्ट्रातील आंबेडकरी समुहाने उत्तर प्रदेश प्रमाणे बसपा सारखे सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे. सत्ता हवेतून मिळतं नाही. सत्तेसाठी सामाजिक मशागत करावी लागते.
महाराष्ट्रात १९८२ साली ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. त्यांना १९८२ ते २०१४ पर्यंत आंबेडकरी समुहाच्या फुटीचा फटका सहन करावा लागला.प्रस्थापित राजकीय पक्ष आणि मिडिया यांनी आंबेडकरी राजकीय पक्षांचे चार नेते ठरवून टाकले. रा. सु. गवई. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि प्रकाश आंबेडकर.
"चोघांची माय अन् खाटल्यावर जीव जाय." अशी अवस्था आंबेडकरवादी राजकीय पक्षाची झाली. समाज एकत्र येतं नव्हता. प्रस्थापित राजकीय पक्ष आमिषे देऊन नेत्यांना विकतं घेतं होते.सतत चौघांची चार दिशेला तोंडे सत्ता कशी मिळणार.? अशाही परिस्थिती वर मात करीत ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः च्या खासदारकीचा,मंत्रीपदाचा त्याग करून आत्ता पर्यंत १० आमदार निवडून आणलेले आहेत. १९९९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन आमदार निवडून आले आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना कॉंग्रेस आघाडीच्या सरकार मध्ये भारिप बहूजन महासंघ सहयोगी पक्ष होता. दोन कॅबिनेट मंत्री,एक राज्यमंत्री आणि एक महामंडळ अशी सत्ता हस्तगत केली.ती आंबेडकरवादी समूहासाठी सत्ता होती. बंजारा समाजाचा कॅबिनेट मंत्री,कोळी समाजाचा कॅबिनेट मंत्री, बारी समाजाचा राज्यमंत्री,बौद्ध समाजाचा खनिकर्म महामंडळाचा अध्यक्ष होता.
ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला पॅटर्न विकसित केला आणि समाजासमोर एक मॉडेल सादर केले. गेल्या ३० वर्षापासून अकोला जिल्हा परिषद ही भारिप बहूजन महासंघ किंवा वंचित बहूजन आघाडीच्या ताब्यात आहे. अकोला पॅटर्न राज्यात राबविला तर आपणं सत्ताधारी होऊ शकतो हा विश्वास ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडला आहे.
हा सत्तासंघर्ष आहे आणि म्हणून ही प्रदिर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. झटपट सत्ता मिळतं नाही. एका निवडणुकीत निराश आणि हताश होणारा कार्यकर्ता हा या सत्ता संघर्षात तग धरू शकत नाही. हा काळ आणीबाणीचा आहे. लोकशाही धोक्यात आहे. विष्णूचा नवीन ईव्हीएम अवतार लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे. सत्तेसाठी झगडणारा समुह निराश आणि हताश झाला पाहिजे म्हणून ईव्हीएमद्वारे झटके देण्याचा प्रयोग केला जातो आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती मध्ये नमूद केले आहे की, इथला प्रत्येक संघर्ष हा सत्ता संघर्ष आहे. सत्ताधारी होण्यासाठी नियोजन बद्ध कार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाला इथं आपलं योगदान देता आलं पाहिजे. सल्ले देणारे अनेक आहेत मात्र निस्वार्थ झटणारे किती आहेत.? विचारवंत, स्वयं घोषित पत्रकार, संपादक, नोकरदार, साहित्यिक,आरक्षण लाभार्थी, कार्यकर्ता आणि मतदार सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण लोकशाही धोक्यात आहे. त्याचे कारण असे की, जसा वामन अवतार झाला आणि बळीचे राज्य गिळंकृत केले. अगदी त्याच धर्तीवर इव्हीएम अवतार आला आहे आणि तो लोकशाही गिळंकृत करुनच थांबणार आहे.
मुठभर सवर्ण नियोजन बद्ध पद्धतीने सत्तेसाठी सातत्यपूर्ण रितीने वर्षातील ३६५ दिवस काम करीत असतात म्हणून ते सत्ताधारी आहेत. आपणं निस्वार्थ वृत्तीने समुहाच्या सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न करतो का.? हा प्रत्येक आंबेडकरवादी माणसाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे आणि मग राजकीय पक्ष आणि नेतृत्वाला सल्ला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आंबेडकरी चळवळीत सबब सांगून कार्य नाकारणारे अनेक आहेत. मात्र नोकरदार असुनही सवर्ण अधिकारी,कर्मचारी आरएसएस मध्ये योगदान देतात. काही सामाजिक कार्याचा दाखला देत राजकीय पक्षांना मदत करतात. सवर्णाकडे कमालीची सामाजिक बांधिलकी आहे आणि म्हणूनच ते सत्ताधारी आहेत.
आंबेडकरवाद्यांनो एकमेकांचा द्वेष करणे थांबले पाहिजे. सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. निराशेच्या गर्तेतून बाहेर पडून आजपासून कार्याला लागले पाहिजे. हताश होण्याचे काहीही कारण नाही. सवर्ण मुठभर आहेत ते समोरासमोरची लढाई कधीच लढतं नाहीत. तुम्ही पुढाकार घेतला आणि बहूजन वर्गाला सोबतं घेऊन सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले तर सवर्ण कोमात जातीलं. आपणं सत्ताधारी असु.
साभार - भास्कर भोजने