निवडणूक आखाड्यात एकूण १४ उमेदवार : ३ लाख ३९ हजार ६६२ मतदार बजावणार मतदानाचा हक्क
फलटण प्रतिनिधि : सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत फलटण - कोरेगाव (अ.जा.) विधानसभा मतदार संघात आज बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या मतदान केंद्रासाठी ईव्हीएम मशीन, व्ही. व्ही. पॅट मशीन, अन्य आवश्यक साधन सामुग्रीसह सर्व शासकीय यंत्रणा आज मंगळवार दि. १९ नोव्हेंबर रोजी येथून रवाना झाली आहे. सदर संपूर्ण यंत्रणा मतदार संघातील सर्व ३५५ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यासाठी सज्ज राहणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
निवडणूक निर्णय अधिकारीतथा प्रांताधिकारी यांचे नियंत्रण
मतदान व मतमोजणी प्रक्रियेची संपूर्ण व्यवस्था, नियोजन व नियंत्रण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निखिल मोरे हे आपल्या सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्याने करीत आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी
शासकीय धान्य गोदाम, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, ईव्हीएम मशीन आणि मतदान केंद्रावरील सुरक्षा त्याशिवाय मतदार संघातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा व ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील महाडिक आपले सहकारी अधिकारी, कर्मचारी यांचे मार्फत करीत आहेत, त्यांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तैनात करण्यात आला आहे.
शासकीय यंत्रणेला माहिती व मार्गदर्शन
येथील शासकीय धान्य गोदाम परिसरात प्रशस्त मंडप उभारुन उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली आहे, तेथे सकाळी ८ वाजले पासून दाखल झालेल्या निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांची नियुक्ती, तेथे जाण्यासाठी असलेली वाहन व्यवस्था, सोबत घेऊन जाण्याचे मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य ताब्यात घेतल्यानंतर, मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर करावयाच्या कामाची माहिती देण्यात आली.
शासकीय यंत्रणा मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी ५९ एस. टी. बसेस व ४ जीप सज्ज
शासकीय धान्य गोदाम परिसर आणि अधिकार गृह इमारतीच्या आवारात ५९ एस. टी. बसेस व ४ जीप मार्ग फलक व त्या मार्गावर असलेल्या मतदान केंद्रांच्या यादी लावून उभ्या करण्यात आल्या होत्या, आपले साहित्य घेऊन तयार असलेले कर्मचारी त्यांना पूर्व कल्पना दिल्याप्रमाणे आपापल्या बस मध्ये बसल्यानंतर एकेक बस मार्गस्थ करण्यात आली.
४२ झोनल ऑफिसर करणार नियंत्रण
मतदान प्रक्रियेची संपूर्ण व्यवस्था विशेषतः मतदान यंत्रणा मतदान केंद्रावर पोहोचली, तेथे संपूर्ण व्यवस्था, उद्या मतदान सुरळीत सुरु झाले, मतदान प्रक्रियेत काही अडचण, किंवा एकादे मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन बंद पडले तर दुसरे मशीन बदलून देणे, मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन व यंत्रणा सुरक्षित फलटण येथे पोहोच होईपर्यंत त्यावर लक्ष देण्याची, तसेच मतदान प्रक्रिया सुरु असताना दर तासाला झालेल्या मतदानाची माहिती व आकडेवारी फलटण येथे नियंत्रण क्क्षात पोहोचविण्यासाठी ४२ झोनल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून त्यांना स्वतंत्र ४२ वाहने देण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
२१३० + राखीव अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती
३५५ मतदान केंद्रांवरील प्रत्येकी १ याप्रमाणे ३५५ केंद्राध्यक्ष, प्रत्येकी ३ याप्रमाणे १०६५ मतदान कर्मचारी, प्रत्येकी १ याप्रमाणे ३५५ शिपाई, प्रत्येकी १ याप्रमाणे ३५५ सुरक्षा कर्मचारी (पोलिस/गृहरक्षक दल जवान) असे एकूण २१३० अधिकारी, कर्मचारी मतदान साहित्य घेऊन दुपारी १ वाजेपर्यंत येथून रवाना झाले, तर या कामी राखीव म्हणून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्रत्येक मतदान केंद्रावर वीज, पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग व वृध्द मतदारांना आवश्यक असेल तर व्हील चेअर आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
व्होटर स्लीप द्वारे मतदारांना मार्गदर्शन
शासकीय यंत्रणेमार्फत प्रत्येक मतदाराला त्यांना कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करता येईल त्या मतदान केंद्राचे नाव, मतदाराचा मतदार यादीतील क्रमांक याची माहिती देणारी छोटी स्लीप घरपोहोच करण्यात आली असून सदर स्लीप व आपले ओळख पत्र घेऊन मतदान केंद्रावर पोहोचल्यावर त्यांना मतदान करणे सोईस्कर होणार आहे.
फलटण - कोरेगाव विधान सभा मतदार संघात १ लाख ७२ हजार ९४० पुरुष, १ लाख ६६ हजार ७०८ स्त्रिया, १४ इतर असे एकूण ३ लाख ३९ हजार ६६२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.