फलटण | धैर्य टाईम्स |
किशोरवयीन मुला/मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल स्वीकारुन त्यांनी आपले जीवन समाधानाने जगावे, या वयामध्ये नको त्या प्रलोभनाला बळी न पडता आपण पुस्तक प्रेमी बनले पाहिजे अशी अपेक्षा निर्भया पथक प्रमुख पोलिस हवालदार वैभवी भोसले यांनी केले आहे.
रयत शिक्षण संस्था संचलित श्री जितोबा विद्यालय,जिंती ता. फलटण येथे आयोजित निर्भया पथक प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलिस हवालदार वैभवी भोसले बोलत होत्या, अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक ताराचंद्र आवळे होते. यावेळी पोलीस हवालदार दत्तात्रय भिसे, अर्चना नलवडे, प्रदीप माने यांच्यासह विद्यालयातील शिक्षक/शिक्षिका, विद्यार्थी/विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
वैभवी भोसले म्हणाल्या,
कळत नकळत आपल्याकडून एखादा गुन्हा होतो, चूक होते याचा पश्चाताप नंतर होतो मात्र वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण वेळीच सावध होणे काळाची गरज आहे. आई - वडिलांची फसवणूक होणार नाही याची मुलींनी जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे. मुलींनो पळून न जाता आई - वडील व गुरुजनांचा विश्वास जपावा.
वैभवी भोसले पुढे म्हणाल्या, गुड टच, बॅड टच कळाला पाहिजे. भविष्यात आपल्याला देशाचे नेतृत्व करायचे आहे त्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुक यामध्ये अडकून न पडता या वयात योग्य शिक्षण घ्या व वाचनाची गोडी लावून आपले आयुष्य सुंदर बनवा, शिक्षण घेऊन पुढची पिढी सुसंस्कृत करा, चुकून आपल्यावर एखादा गुन्हा दाखल झाला तर भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे योग्य मार्गाने जा व आयुष्यात संधीचे सोने करा.
ताराचंद्र आवळे म्हणाले, जीवन सुंदर आहे ते अधिक सुंदर करा व शिक्षणाने आपल्या जीवनास आकार द्या. मानवी जीवन ही आपणास एकदाच मिळालेली संधी आहे त्या संधीचे सोने करा. वाचनाने माणूस घडतो त्याप्रमाणे वाचन संस्कृती वाढीस लावा व कळत नकळत आपल्याकडून गुन्हा होणार नाही किंवा चूक होणार नाही याची काळजी घ्या. किशोरवयामध्ये होणारे बदल सकारात्मक विचाराने स्वीकारा व आनंदी जीवन जगा.
प्रारंभी अंकुश सोळंकी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली, सौ. गौरी जगदाळे यांनी सूत्रसंचालन, विद्या जमदाडे यांनी समारोप व आभार मानले.