नांदेड : राजकीय दृष्टीकोनातून ओबीसींचे हक्क डावलायला निघालेले आहेत त्यांनाच आता ओबीसींनी डावललं पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला केले आहे. ते नांदेड येथील प्रचार सभेत बोलत होते. या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
ॲड. म्हणाले की,आरक्षणामुळे आपला विकास झाला असेल, तर आरक्षणाच्या बाजूने आपण उभे राहिले पाहिजे, वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. जेवढा ओबीसी आरक्षणाला धोका आहे तेवढाच धोका आता एससी, एसटी आरक्षणाला आहे. एससी, एसटी आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भातील निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यातून आपण बोध घेतला पाहिजे. एससी, एसटी आरक्षणाचा निकाल हा फक्त वर्गीकरणाच्या संदर्भातील नव्हता. तर या बरोबर क्रिमीलेयर सुद्धा लागू होणार आहे. एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, तर ते कुटुंब क्रिमीलेयरमध्ये येते आणि एकदा क्रिमीलेयरमध्ये आले की आरक्षण मिळणार नाही.
आरक्षणाचा निर्णय मान्य नसेल, तर रस्त्यावरची लढाई करून, मोर्चा काढून जिंकता येणार नाही. परिसंवाद घेऊन जिंकता येणार नाही. कोर्टाचे निर्णय रद्द करण्याचे अधिकार कोणाला आहेत, तर संसद आणि राज्य विधानसभेला आहे. त्यामुळे यासाठी नुसते मतदान करून चालणार नाही, तर आमदार निवडून आणले पाहिजेत. आमदार निवडून आले, तर आपल्या हात मजबूत होत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
पदोनत्तीमध्ये आरक्षण लागू झाले पाहिजे असे म्हणणारे जे आहेत. त्यांना माझं सांगणं आहे की, आरक्षणाचे तत्व आधी वाचवूया आणि मग पदोनत्तीमधील आरक्षणाच्या लढाईला आपण सुरुवात करूया. असे म्हणत त्यांनी पदोनत्ती आरक्षणाची लढाई हाती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मुस्लिम समाजात वंचित बहुजन आघाडी आणि माझ्याबद्दल अपप्रचार चालला आहे. हे करणारे काँग्रेसचे बांडगूळ आहेत याची मला जाणीव आहे. लातूरच्या भाषणाची मोडतोड करून ते मुस्लिम समाजात व्हायरल केलं जातं असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
या विधानसभेत आपण मोहम्मद पैगंबर यांच्या बाजूने मत द्या, मोहम्मद पैगंबर बिल लागू करण्यासाठी मतदान द्या. वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मतदान द्या. मी आपल्याला आश्वासन देतो की, मोहम्मद पैगंबर बिल लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असे आश्वासन ॲड. आंबेडकर यांनी यावेळी दिले.