फलटण - कोरेगाव - विधानसभा (अ. जा.) मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या एकूण १४ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात आज लॉक झाले असून अतिशय चूरशीच्या ठरलेल्या या मतदार संघातील सर्वांनाच आता २३ नोव्हेंबरची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान आज पूर्ण झालेल्या मतदान प्रक्रियेतून मतदार संघातील ३ लाख ३९ हजार ६६२ मतदारांपैकी 2,41,329 मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाच्या ७१. ०५ टक्के मतदान शांततेत झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. अंतिम आकडेवारीचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते.
फलटण - कोरेगाव विधानसभा मतदार संघातून एकूण १४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार दिपक चव्हाण, महायुतीचे उमेदवार सचिन पाटील, परिवर्तन महाशक्तीचे प्रा. रमेश आढाव व राष्ट्रीय समाज पक्षाचे दिगंबर आगवणे यांच्यात प्रमुख चौरंगी लढत होत आहे.
मतदान प्रक्रियेची संपूर्ण व्यवस्था, नियोजन व नियंत्रण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी आपल्या सहकारी अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्याने केली.