फलटण दि. १७ : सामाजिक, कौटुंबिक जीवनात काम करताना किंवा आपली विविध क्षेत्रातील जबाबदारी निभावताना आवश्यक शारीरिक, मानसिक, वैचारिक शक्ती आपल्यापाशी असायला हवी त्याशिवाय यशस्वी होता येणार नाही आणि म्हणून व्यायाम, अभ्यास, शिक्षण याला महत्व देवून ते आत्मसात करण्याला विशेषतः तरुणांनी प्राधान्य द्यावे अशी अपेक्षा महाराष्ट्र पोलिस दलातील फोर्स वन चे पोलिस उप महासंचालक कृष्णप्रकाश यांनी व्यक्त केली.
जोशी हॉस्पिटल प्रा. लि. आणि रोबोटिक सेंटर, फलटण आयोजित आपली फलटण मॅरेथॉन २०२३ स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना पोलिस उप महासंचालक कृष्णप्रकाश बोलत होते, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपिठावर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी नगराध्यक्ष दिलिपसिंह भोसले, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, अरविंद मेहता, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. सौ. प्राची जोशी उपस्थित होते.
आपले शरीर हे आपल्या सर्व कर्तव्यांना सिध्द करण्याचे सर्वप्रथम साधन आहे, त्यामुळे तुमचे स्वास्थ्य वा तंदुरुस्ती हे सर्वप्रथम आवश्यक असल्याचे नमूद करीत प्रत्येकाचे एक व्यक्तिमत्व आहे व त्यामध्ये सिध्द होण्याची शक्ती व अफाट क्षमता आहे, परंतू आपण त्याला सिध्द करीत नसल्याचे स्पष्ट करताना आपले शक्तिस्थान मजबुत असायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन कृष्णप्रकाश यांनी केले.
स्वतःला सशक्त बनविण्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे. जर तुम्ही नियमित व्यायाम करीत असाल, लोकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असाल, हितगुज करीत असाल तर तुमच्या शरीरातील आनंदी संप्रेरक आपोआप कार्यरत होतो व तुम्हाला स्वयंपुर्ण बनवतो असे सांगताना गेल्या २२ वर्षांपासून डॉ. प्रसाद जोशी रुग्ण सेवेत कार्यरत आहेत, रुग्णांना सेवा देवून त्यांना ते पुन्हा चालायला, धावायला लावतात त्यांच्या जीवनात आनंद फुलवितात, एक अनोखी शक्ती त्यांना देतात त्यामुळे खऱ्या अर्थाने डॉ. जोशी देव असल्याचे कृष्णप्रकाश यांनी आवर्जून सांगितले.
वैद्यकीय जीवन, सामाजिक जीवन व रुग्णांच्या अपेक्षा या सर्वांचा डॉ. प्रसाद जोशी यांनी उत्तम समतोल साधला असल्याचे स्पष्ट करुन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, राजकारणाची दिशा आमच्या हाता मध्ये असेल - नसेल परंतू प्रशासनाची दिशा कृष्णप्रकाश यांच्या सारख्या कर्तव्यनिष्ठ, धाडसी, अपेक्षा नसणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती असायला हवी, त्यांच्या सारखे आणखी ३० टक्के अधिकारी मिळाले तर सर्वसामान्य माणसाचे निश्चितपणे भले होईल असा विश्वास आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडला.
पोलिस अधिकारी बदलीला घाबरत असल्याचे नमूद करीत जर बदलीला वरिष्ठ पोलिस अधिकारी घाबरायला लागले तर चांगले पोलिसींग होणार कसे असा सवाल करीत पोलिसांनी आपण पोलिस आहोत हे विसरु नये, ही आपली अपेक्षा आहे, कायद्यानुसार जे योग्य आहे त्यानुसार कोणाचा विचार न करता वागावे असे सांगत परंतू या प्रमाणे होत नसल्याची आपली व्यथा आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृष्णप्रकाश यांच्या समोर ठेवली, यामध्ये दिवसें दिवस वाढ होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व परीस्थिती नियंत्रणा बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांकास १० हजार रुपये व सन्मान पत्र, द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व सन्मान पत्र, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व सन्मान पत्र या प्रमाणे पारितोषिक देण्यात आली.
यामध्ये १८ ते ३० वयोगटातील स्त्री - पुरुष जोश पूर्ण युवा गट, ३१ ते ४५ वयोगटातील स्त्री - पुरुष सळ सळती तरुणाई, ४६ ते ६४ वयोगटातील स्त्री - पुरुष प्रगल्भ प्रौढ आणि ६५ व त्यावरील वयोगट स्त्री - पुरुष अनुभवी ज्येष्ठ आणि Robotic Knee Replacement झालेल्या पहिल्या ५० रुग्णांसाठी असे ५ गट ठेवण्यात आले होते.
प्रारंभी डॉ. प्रसाद जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात गेली ९ वर्षे मॅरेथॉन आयोजित करुन सर्वसामान्यांना शारीरिक तंदुरुस्ती जपण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे व त्यासाठी मॅरेथॉन सह विविध उपक्रम राबविताना फलटण करांची उत्स्फूर्त साथ लाभत असल्याचे निदर्शनास आणून दिले.
या कार्यक्रमात हॉकी मधील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करुन संघाला विजयश्री मिळवून देणारी उत्कृष्ट खेळाडू कु. अक्षता ढेकळे हिचा कृष्ण प्रकाश व आ. श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.
वारकरी संघटनेच्यावतीने कृष्ण प्रकाश यांना फेटा बांधून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, धुमाळवाडी गावाला फळांचे गाव असा वेगळा दर्जा देवून महाराष्ट्र शासनाने गौरविल्याबद्दल या समारंभात गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व कृषी अधिकारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
नवनाथ कोलवडकर यांनी सूत्रसंचालन आणि डॉ. सौ. प्राची जोशी यांनी समारोप व आभार मानले.