भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सदर कारवाईत वनविभागाने संशयितांकडून ६ जिवंत हातबॉम्ब, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३० रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. तर आज रविवारी ३१ रोजी सकाळी त्या परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत.
पाटण : भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सदर कारवाईत वनविभागाने संशयितांकडून ६ जिवंत हातबॉम्ब, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३० रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. तर आज रविवारी ३१ रोजी सकाळी त्या परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत.
अजय पोपट कोळी रा. भेदा चौक, कराड, उमेश नेताजी मदने व महेश भीमराव मंडले दोघेही रा. दुधोंडी ता. पलूस जि. सांगली अशी वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयित शिकाऱ्यांची नावे आहेत.
दरम्यान, या प्रकरणात एकूण ५ सशयितांचा समावेश असून वनविभागाने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शिकाऱ्यांनी जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवण्यासाठी वनविभागाच्या पथकाने त्यांना सदर ठिकाणी नेले. यावेळी पथकाला हात बॉम्ब दाखवताना अंधाराचा गैरफायदा घेऊन त्यातील दोघे पसार झाले. मात्र, तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद करण्यात आले आहे.
याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री ढेबेवाडी वनक्षेत्रातील भोसगाव वनकक्ष क्रमांक ५५३ मध्ये शिकारी टोळी हात बॉम्ब गोळ्याच्या साह्याने रानडुकरांची शिकार करण्याच्या उद्देशाने आली असल्याची माहिती वनविभागाला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर तात्काळ वनपाल भोसगाव व वनरक्षक घोटील, कायम वनमजूर यांच्यासह वनविभागाचे पथकाने सदर परिसरात सापळा रचून दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून शिकारीसाठी तयार करण्यात आलेले ६ हातबॉम्ब व २ दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात एकूण पाच सशयितांचा समावेश होता. त्यातील तिघे जागोजागी ठेवलेले हात बॉम्ब दाखवताना अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून अन्य तिघांना वनविभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. तसेच फरारी संशयित शिकाऱ्यांचा वनविभागाकडून शोध सुरू आहे. सशयितांवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत उपवनसंरक्षक सातारा एम.एन. मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल पाटण एल.व्ही. पोतदार यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल भोसगाव सुभाष राऊत, वनरक्षक घोटील जे. आर. बेंद्रे, वनरक्षक काळगाव व्ही.व्ही. डुबल, वनरक्षक कुंभारगाव एस. एस. पाटील, वनरक्षक सणबूर ए. एस. पन्हाळे, वनरक्षक खळे एस. एस. सुतार, तसेच वनमजूर एस. एस. मुल्ला, आर.पी. सातपुते आदींचा समावेश होता.
दरम्यान, रविवारी ३१ रोजी सकाळी वनविभागाच्या पथकाने संशयित शिकाऱ्यांना पकडलेल्या परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत. त्यामुळे या घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे. खाद्य समजून बॉम्ब खाल्ल्याने रानडुक्करांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून त्याचा नेमका तपशील उपलब्ध झालेला नाही.