सातारा प्रतिनिधी
: माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचे काम करू नये तर समाजाचे प्रबोधन करण्याचे देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसे तुम्ही व्हावे. तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असण्याबरोबरच सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व दिले जावे, यामुळे पत्रकारितेचा गौरव वाढेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मावळा फौंडेशन आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यिक आणि पत्रकारांतर्फे ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांचा गौरव समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे विभागीय अधिस्वीकृतीचे अध्यक्ष हरीष पाटणे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सर्व पत्रकारांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही आता काळाची गरज आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आता पत्रकारितेतही होत आहे. हे तंत्रज्ञान आता पत्रकारांनीही अवगत केले पाहिजे. पत्रकारितेचे मूल्ये ही केवळ पत्रकारच जपू शकतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. पत्रकारांवर हल्ले व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने कसे कायदेशीर संरक्षण देता येईल यासाठी प्रयत्न केला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्येष्ठ पत्रकारांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाते असे सांगून अजित पवार म्हणाले, पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दरमहा ११ हजार रुपये दिला जाणारा सन्मान निधी 20 हजार रुपये करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. तसेच शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून पत्रकारांच्या कुटुंबीयांना विविध प्रकारे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचे काम शासन करीत आहे. शासन म्हणून काम करत असतानाच समाजातल्या सर्व घटकांना आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल, सर्वांचे प्रश्न हे कसे मार्गी लावता येतील यावर शासनाचा भर आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकीहाळ यांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकाच्या उभारणीसाठी अतिशय मोलाची भूमिका त्यांनी बजावली. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव आणि कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केले. श्री. बेडकीहाळ यांनी पत्रकारितेला एक दिशा दिली. त्यांनी केवळ पत्रकारिता व्यवसाय न मानता समाज जागृतीचं साधन म्हणून स्वीकारले. त्यांचे योगदान आजच्या तरुण पत्रकारांसाठी एक आदर्श आहे. त्यांनी लेखनातून आणि कार्यातून सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि मराठी भाषेचा, संस्कृतीचा गौरव यांचा सातत्याने पुरस्कार केला. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजातील दुरावस्थेवर प्रकाश टाकण्याचे काम केले. रवींद्रजींनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये पत्रकारितेप्रमाणे साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. मर्ढे येथील बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकासाठी त्यांनी पाठपुरावा केला. हे स्मारक पूर्ण झाले असून याचे लोकार्पणही लवकर करु असेही, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील म्हणाले, पत्रकार आणि साहित्य हे कुठल्या एका विचाराचे नसतात आणि कुठल्याही एका विचाराबरोबर ते जात नाहीत. जे दिसतं घडतं त्यावर ते त्यांचे मोकळेपणाने आणि स्पष्टपणे भाष्य करतात. श्री. बेडकीहाळ यांनी ही तत्वे जपली आहेत, परंतु त्यांनी पवार कुटुंबीयांशी आपले नाते हे आजपर्यंत ही अतिशय उत्तम पद्धतीने कायम ठेवले. पत्रकारिता, साहित्य क्षेत्राबरोबरच, समाजकारणसुद्धा उत्तम पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील कविवर्य बा.सी. मर्ढेकर, कवी यशवंत, कवी गिरीश आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि या जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात रवींद्रजी बेडकीहाळ यांची वाटचाल, त्यांचा विचार आणि साहित्यक्षेत्रामध्ये त्यांनी केलेले काम हे निश्चितपणाने एक आगळावेगळा ठसा निर्माण करणारे आहे.
सत्काराला उत्तर देताना श्री. बेडकीहाळ म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान निधी 11 हजार रुपये होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी 50 कोटी रुपयांची तरतुद केली. आता हा निधी 20 हजार रुपये करण्यात आला आहे. बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडत होता. साडेबत्तीस लाख रुपये देण्यात आले. हे स्मारक पूर्ण झाले आहे. त्याचे लवकरात लवकर लोकर्पण व्हावे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमास साहित्य क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.