फलटण प्रतिनीधी:- शायनिंग महाराष्ट्र या प्रदर्शनाची हवाच निघाली असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून नागरिकांनी या प्रदर्शनाकडे पूर्ण पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रदर्शन स्थळावर गर्दी करण्यासाठीचे साकडे तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना व शाळा प्रमुखांना घातल्याने प्रदर्शन स्थळावर फक्त विद्यार्थी दिसत असल्याने प्रदर्शन सपशेल फेल झाल्याचे दिसते आहे.
केंद्र सरकारच्या विविध योजना व खात्यांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना एकाच छताखाली देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या जनजागृती अभियानांतर्गत दिल्लीतील सांसा फाउंडेशनच्यावतीने फलटण येथील शुभारंभ लॉन्समध्ये शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन सोहळा सोडला तर दिवसभर प्रदर्शन स्थळावर शून्य टक्के नागरिकांच्या प्रतिसादाचे चित्र होते. आयोजकांनी याची धास्ती घेऊनच प्रदर्शन स्थळावर गर्दी करण्यासाठी स्थानिक शाळांच्या शाळा प्रमुखांना व विद्यार्थ्यांना खाजगी बसची सोय करून आमंत्रित करण्यात आले होते.
या प्रदर्शनाच्या एकूण पार्श्वभूमीवर सांसा फाउंडेशनचे प्रमुख एम.एम.भास्कर यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटून विचारले असता ते म्हणाले, या प्रदर्शनात केंद्र स्तरावरील एकूण ३५ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. गतवर्षापेक्षा यावर्षी आयोजित शायनिंग महाराष्ट्र प्रदर्शनास अल्प प्रतिसाद मिळत आहे.
एकीकडे सामान्य नागरिकांनी या प्रदर्शनाला पाठ फिरवली असताना दुसरीकडे शाळेतील मुलांना बोलवून घेतले जात असल्याने या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भासवले जात आहे. ढसाळ नियोजन व प्रसिध्दीची कमतरता केंद्र सरकारच्या लाखो रुपयांची नासाडी होत असून सामान्य नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचण्याचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही.