फलटण | सचिन मोरे |
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फलटण येथील पुतळा व परिसरातील सुशोभिकरण कधी होणार असा प्रश्न आता आंबेडकर अनुयायी विचारू लागले आहेत. नुकतीच डॉ. आंबेडकर यांची १३४ वी जयंती पूर्ण जगभर मोठया उत्साहात साजरी झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर आता येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही राजकीय पुढाऱ्यांनी पुतळा सुशोभिकरणासाठी आपण कोट्यावधींचा निधी मंजूर केलेचे यापूर्वी सांगितले होते, त्या राजकीय थापा होत्या का? हाही प्रश्न आता आंबेडकर अनुयायांना भेडसावू लागला आहे.
फलटण नगर परिषदेच्या जुन्या इमारती समोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या हस्ते इंदुमती मोहन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली १९६९ साली मोठया दिमाखात अनावरण करण्यात आले होते. तब्बल ५६ वर्षानंतरही डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे व परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले नसल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये नाराजीचा सूर दिसू लागला आहे.
यापूर्वी अनेकवेळा फलटणच्या जाहीरसभेत व पत्रकार परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येईल अशा वल्गना राजकीय नेत्यांनी केल्या होत्या. मात्र या वल्गना केवळ आंबेडकरी अनुयायांची मते मिळवण्यासाठीच होत्या का ? असा संशय आता आंबेडकरी अनुयायांमध्ये व्यक्त होऊ लागला आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तेलंगणात दोन वर्षांपूर्वी देशातील सर्वात उंच १७५ फूट पुतळा उभारला जातो. तर इकडे आहे त्या पुतळ्याचे सुशोभिकरण नाट्य सुरु आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर पुतळा सुशोभिकरण हे आता राजकीय भांडवल तर झाले नाही ना ? अशीही शंका आता वाटू लागली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फलटणला २३ एप्रिल १९३९ रोजी आले होते. त्यांनी येथे एक सार्वजनिक सभा घेतली आणि लोकांना सामाजिक न्याय आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले होते. याच वेळी फलटणचे संस्थांनचे तत्कालीन संस्थांनाधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब यांना राजवाड्यात चहासाठी आमंत्रित केले होते. ही ऐतिहासिक भेट होती. महामानवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असणाऱ्या फलटण शहरांमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली आंबेडकरी अनुयायांच्या भावनेशी खेळ तर सुरु नाही ना?