केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना पोषणतत्व गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदूळ (पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ) वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना ही मा. पंतप्रधान महोदयांची महत्त्वाकांक्षी योजना असून त्यानुसार सातारा जिल्हयात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत पात्र प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थीना फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करणेत येत आहे. अशी माहिती श्रीमती वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांनी दिली.
आहारामधील सूक्ष्म पोषकतत्वांची कमतरता भरुन काढण्याकरिता केंद्र शासनाने गुणसंवर्धीत तांदूळ (फोर्टिफाइड तांदूळ) राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत वितरीत करणेस मान्यता दिलेली आहे. फोर्टिफाइड तांदूळामध्ये जीवनसत्व B-12, फॉलिक अॅसिड व लोह या सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश असतो. पोषकतत्वे मिळवण्याच्या दृष्टीने फोर्टीफाइड तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. फोर्टिफाइड तांदूळ व नियमित तांदूळ याचे प्रमाण 1:100 असे आहे. म्हणजेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पुरवठा करण्यात येत असलेल्या तांदूळामध्ये फोर्टिफाइड तांदळाचे प्रमाण 1 किलोमध्ये 10 ग्रॅम या प्रमाणात आहे. प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टिफाइड तांदळाचे वजन हे नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसतो. फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजवणेत यावा. यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळीं कार्यपद्धती अवलंबवण्याची आवश्यकता नाही.
सदर फोर्टिफाईड तांदूळामधील लोह हे अशक्तपणा व तांबडया पेशींची कमतरता दूर करते. फॉलिक अॅसिड गर्भाचा विकास व नवीन रक्त पेशी बनविणेस उपयुक्त आहे. विटामिन B-12 मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत सुरु ठेवते. अशाप्रकारे फोर्टिफाईड तांदूळ हा पोषणतत्वांनी युक्त तांदूळ असलेने लाभार्थ्यांचे आरोग्याचे दृष्टीने अत्यंत लाभदायक आहे. फोर्टिफाईड तांदूळ हा सामान्य तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतो. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना पोषक घटक असलेले धान्य मिळावे यासाठी विविध पोषक घटकांचा अंतर्भाव असलेला फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करणेत येत आहे.
फोर्टिफाईड तांदळाचे अनुषंगाने पसरवणेत येणाऱ्या अफवांवर नागरीकांनी विश्वासू ठेऊ नये. सदर फोर्टिफाईड तांदूळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका/अडचणी असल्यास आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्रीमती वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी सातारा यांनी केले आहे.