पंताचा कोट परिसरात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरातील चित्रकला महाविद्यालयात अनेक वर्षांपासून ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. यातील दगडी जातं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन असल्याचा दावा इतिहास संशोधक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी केला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासातून याचा उलगडा झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
कराड : येथील पंताचा कोट परिसरात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरातील चित्रकला महाविद्यालयात अनेक वर्षांपासून ऐतिहासिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. यातील दगडी जातं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन असल्याचा दावा इतिहास संशोधक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांनी केला आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासातून याचा उलगडा झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मिरज इतिहास संशोधन मंडळाच्यावतीने विविध भागातील ऐतिहासिक, पुरातन शिल्पे, शिलालेख यांचा शोध घेवून त्यावर संशोधन केले जात आहे. सुमारे तीन महिन्यांपुर्वी मंडळाचे अभ्यासक व संशोधक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर येथील डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात आले होते. यावेळी त्यांना महाविद्यालयाच्या शेजारील चित्रकला महाविद्यालयात जतन करुन ठेवण्यात आलेली तीन पुरातन जाती, शिलालेख, वीरगळ, मूर्ती आदी शिल्पे दाखवण्यात आली. त्यांनी या पूरातन शिल्पामधील एक जातं प्राचार्याच्या परवानगीने मिरजला नेले. तेथे याबाबत सखोल संशोधन करण्यात आले. त्यानंतर हे जातं दोन हजार वर्षापूर्वीचे व सातवाहनकालीन असल्याचे अभ्यास मंडळाच्या वतीने कुमठेकर व प्रा. काटकर यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश घाटगे आणि इतिहास विभागाचे प्रा. सचिन बोलाईकर यांच्या सहकार्याने या जात्याचा अभ्यास करण्यात आला. सातवाहन काळात तीन फूट परिघाच्या या जात्याला असलेल्या छिद्रातून लाकडी दांडकं घालून ते फिरवलं जाई. अशी जाती काही दिवसांपूर्वी जुन्नर आणि उस्मानाबाद परिसरातही आढळल्याच्या नोंदी असल्याचेही प्रा. काटकर व कुमठेकर यांनी सांगितले.
कराड शहराला मोठा प्राचीन इतिहास आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, कलचुरी, शिलाहर, यादव अशा राजवटींबरोबरच बहामनी, आदिलशाही, मुघल आणि मराठ्यांनी इथे राज्य केले आहे. त्याबाबतच्या अनेक ऐतिहासिक खुणा या परिसरात आढळून आल्या आहेत. त्यानंतर आज याच परिसरात सातवाहनकालीन जातं सापडले असून यावरून येथील सातवाहनकालीन इतिहासाचाही उलगडा झाला आहे. महाविद्यालयाच्या आवारात आढळलेल्या वीरगळ, जुन्या मंदिरांचे अवशेष, जुने पाटा-वरवंटा, शिलालेख आदींचा अभ्यासही मिरज इतिहास मंडळाकडून सुरु असल्याचे सांगण्यात आले.
महाविद्यालय परिसरात अनेक ऐतिहासिक वस्तूंचे जतन
डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या परिसरातील चित्रकला महाविद्यालयात पुरातन तीन जाती, वीरगळी, फुटलेल्या अवस्थेत असलेले शिलालेख, पाटा-वरवंटा आदी. वस्तू शिक्षक व विद्यार्थ्यांनी जतन करुन ठेवल्या होत्या. यामधील काही वस्तू विद्यार्थ्यांना आढळून आल्या होत्या. तीन महिन्यापूर्वी प्रा. काटकर व कुमठेकर हे महाविद्यालयात आले होते. त्यांनी यामधील एक जातं अभ्यासासाठी नेले होते. अभ्यासानंतर हे जातं दोन हजार वर्षापूर्वीचे सातवाहनकालीन असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. याबाबतची माहिती कालच त्यांच्याकडून महाविद्यालयास प्राप्त झाली.
- डॉ. सतीश घाटगे (प्राचार्य, शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालय, कराड)