रुग्णालयातून रुग्ण घरी आल्यानंतरही काही रुग्णांना दीर्घकाळ ठराविक साधनांची गरज भासते. ही साधने त्या काळात अत्यावश्यक असली, तरी काही काळानंतर त्या साधनांची रुग्णांना गरज भासत नाही. गरीब व गरजू कुटुंबातील रुग्ण अशी साधने कायमची विकत घेऊ शकत नाहीत.
कराड : येथील गरजू रुग्णांच्या सेवेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, कराड यांच्या वतीने रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र नुकतेच सुरु करण्यात आले आहे. या केंद्रात रुग्णांना आवश्यक साहित्य ठेवण्यात आले असून ते अल्पदरात उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे गरजूंनी आवश्यकतेनुसार साहित्य नेण्याचे आवाहनही समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
रुग्णालयातून रुग्ण घरी आल्यानंतरही काही रुग्णांना दीर्घकाळ ठराविक साधनांची गरज भासते. ही साधने त्या काळात अत्यावश्यक असली, तरी काही काळानंतर त्या साधनांची रुग्णांना गरज भासत नाही. गरीब व गरजू कुटुंबातील रुग्ण अशी साधने कायमची विकत घेऊ शकत नाहीत. रुग्णावरील होणाऱ्या औषधोपचारांच्या खर्चाने आधीच कुटुंब खचलेले असते. अशा वेळी अत्यल्प भाडे दरात ही साधने उपलब्ध करून दिल्यास रुग्णाची पैशांची बचत होऊन त्यांची निकडही भागवली जाते. या उद्देशाने जनकल्याण समितीच्या वतीने राज्यभरात रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्रे चालवली जात आहेत.
त्यानुसार कराडमध्येही रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला उपलब्ध साधनांच्या साहाय्याने हे केंद्र सुरू झाले. सध्या, या केंद्रात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, फोल्डिंग व्हील चेअर, फोल्डिंग कमोड चेअर, वाँकिंग स्टिक, वॉकर विथ व्हील, युरिन पॉट इ. साधने उपलब्ध आहेत. रुग्णांच्या मागणीप्रमाणे इतर आवश्यक साधनेही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जनकल्याण समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.
या सेवेचा लाभ घेण्यासाठी आश्विनी क्लीनिक, मंगळवार पेठ, कन्याशाळेसमोर, कराड संपर्काची वेळ व क्रमांक : दु. 12 ते सायंकाळी 7 पर्यंत, मोबाईल क्रमाक 9422031040 याठिकाणी संपर्क करावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.