श्रीमंत रामराजे यांच्या कडून भीमजयंतीच्या शुभेच्छा : दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त निघालेल्या शोभयात्रेस भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
फलटण : (प्रतिनिधी )
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती फलटण शहर व तालुक्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. पंचशील चौक, फलटण येथून निघालेल्या भव्य शोभयात्रेचा शुभारंभ माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी तालुक्याचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे, प्रल्हादराव साळुंखे - पाटील, ॲड. नरसिंह निकम, पिंटू इवरे, अमीर शेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे सदस्य जेष्ठ नेते विजयराव येवले, मुन्ना शेख, संजय अहिवळे, संजय निकाळजे, राजू मारुडा, सुधीर अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सायंकाळी सात वाजता पंचशील चौक, मंगळवार पेठ येथून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व त्यांच्या जीवनावरील विविध प्रसंगांचे चित्ररथासह शहर व तालुक्यातील ग्रामस्थांच्या सहभागाने आकर्षक विद्युत रोषणाई व सजावटीत प्रचंड शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करून भीम सैनिकांनी परिसर दणाणून सोडला. कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव या शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारी सकाळपासून नगर परिषद कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. महोत्सव समितीच्यावतीने संपूर्ण परिसरात रोषणाई तसेच सजावट केली होती. याच ठिकाणी दिल्ली येथील संसद भवनाची प्रतिकृती साकारत भारताचे संविधान व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनीही डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. शहर व तालुक्यातील अन्य संस्था, संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, पत्रकार, उद्योजक व शहरवासीय तसेच तालुक्याच्या विविध भागांतून आलेल्या आबालवृद्धांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.