फलटण प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या फलटण तालुका निमशासकीय सदस्यपदी शिवसेना फलटण तालूका प्रमुख पिंटू तथा नानासाहेब इवरे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची मोठ्या प्रमाणावर नोंदणी सुरू झाली आहे.या योजनेची देखरेख करणे, संनियंत्रण करणे, योजनेच्या अंमलबजावणीकरीता नियमित आढावा घेणे, सदर योजनेपासून कोणतीही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे, ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी व तपासणी करणे, अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे याकरीता शासन निर्णय तरतुदीनुसार तसेच पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या शिफारशींच्या आदेशान्वये फलटण तालुक्याकरीता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना तालुकास्तरीय आढावा समिती गठीत करण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी आमदार दिपक चव्हाण हे असणार आहेत तर सचिव म्हणून तहसीलदार डॉ. अभिजित जाधव हे काम पाहणार आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या फलटण तालुका निमशासकीय सदस्यपदी नानासाहेब इवरे यांच्या निवडी बद्दल त्यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.