एक दिलासा देणारे, चांगुलपणाचा भरोसा देणारे, रचनात्मक कार्याचा ध्यास असणारे, विधायक विचारांचा सातत्याने पाठपुरावा करणारे, समाजाला एक सरळ आणि सभ्य विचारसरणीच्या दिशेने नेणारे, समाजाचे राहणीमान उंचावणारे स्वतःला सत्कार्यात सातत्याने झोकून देणारे, एक निर्मळ मनाचे, परोपकारी उदार व्यक्तिमत्व असणारे, समाजाला प्रेरणादायी असणारे व्यक्तिमत्व म्हणजे कै. सुभाष काका सूर्यवंशी (बेडके त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !
समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात विशेष करून शिक्षण क्षेत्रात सातत्याने अलौकिक कार्य केलेल्या सुभाष काकांना आपल्या मधून जाऊन आज एक वर्ष झाले आहे लौकीक अर्थाने ते आपल्यातून गेले असले तरी त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे ते अनंत काळापर्यंत आपल्या सोबत राहणार आहेत कै. काकांच्या पश्चात त्यांच्या सुविध्य पत्नी सविता काकी यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदाचा भार स्वीकारून एक प्रकारे काकांना व त्यांनी केलेल्या असामान्य कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली च वाहिली आहे.
सामाजिक कार्याचा ध्यास असलेले सुभाष काका सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शन ठरू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. विचारांची प्रगल्भता विचार आणि आचार यामध्ये सतत सुसंगती जी आजकाल अगदी अभावानेच आढळते, मर्यादशील पणा व बाणेदारपणा यांचा सुरेख संगम शक्य असेल त्या सर्वांना यथाशक्ती मदत करण्याचा मनाचा मोठेपणा खोटी आश्वासने न देता दिलेल्या शब्द वचनाप्रमाणे पाळून त्याची पूर्तता दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी प्रथम स्मृती दिन त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !" या सदविचाराचे बीज त्यांनी माणसांच्या मनात रुजविले माणसांच्या मनाला जाऊन भिडणारे वक्तृत्व आणि कर्तृत्व, सुडाची भावना न जोपासता क्षमाक्षिल वृत्तीने माफ करण्याचा मनाचा मोठेपणा केवळ तेच दाखवू शकतात. सर्वांविषयी सातत्याने विशाल दृष्टिकोन ठेवून सर्व समावेश कृती हे त्यांचे वैशिष्ट्य ठरते जे चांगलं आहे त्याची नितांत आवड गुणवत्तेची कदर करून प्रोत्साहन देण्यासाठी पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे औदार्य ही फक्त तेच मोकळ्या मानाने दाखवू शकतात.
कै. सुभाष काकांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग, कृषी अशा सर्वच क्षेत्रात काम करताना समाजातील लोकांच्या मदतीचे धोरण अवलंबले, अनेक बेरोजगार युवकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला, युवकांना व्यावसायिक मार्गदर्शन करून इतर मदतही केली, आज सातारा जिल्ह्याबरोबर शेजारी जिल्ह्यातील बरेच युवक फलटण तालुक्यात स्वतःच्या पायावर उभे आहेत याचं संपूर्ण श्रेय सुभाष काकांनाच द्यावे लागेल.
कै. सुभाष काकांचा जन्म थोर घराण्यात झाला या घराण्याचा आदर्श स्वातंत्र्यपूर्व काळापासून फलटण तालुक्यावर होता या घराण्याकडे संस्कार वारसा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण, कै. नाना यांचेकडून काकांनी घेऊन तो फलटण तालुक्याला दिला.
कै. नाना यांनी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे रोप लावले व या रोपाचा वटवृक्ष करण्याचे काम कै. काका यांनी केले. आचार आणि विचार यात ताळमेळ असावा हे वाक्य काकांच्या आचरणातून नेहमीच अनुभवास येते. काकांनी बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करून देऊन तळागाळातील व्यक्ती मोठी व्हावी त्यांचे कुटुंब मोठे व्हावे व त्यांच्या हातून समाजसेवा घडावी असा विचार काकांच्या मनात नेहमीच होता हा विचार सत्यात आणण्यासाठी ते बहुजन समाजातील लोकांना नेहमी संधी देत होते.
साम्राज्यापेक्षा समाधानाची किमत मोठी असते हा कै. काकांचा विचार त्यांच्या आचरणातून नेहमीच दिसून येतो. त्यांनी राजकारणात इतरांना उच्च पदापर्यंत आरूढ केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वतः अहोरात्र प्रयत्न केले. मानवता श्रेष्ठ आहे हा कै. काकांचा विचार त्यांच्या कृतीतून दिसून येतो.
कै. नाना यांनी काढलेल्या शाळांचा विस्तार करणे, इमारती क्रीडांगणे उभी करणे या गोष्टी महा कठीण होत्या अशा या बिकट परिस्थितीत विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी जबाबदारी पार पाडण्याची ठरवले आणि अगदी कालपर्यंत त्यांनी या ध्येयाचा पाठपुरावा करून ते तडीस नेले आहे. त्यांच्या या अफाट कार्यामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा एक अविभाज्य भाग म्हणजे सुभाष काका एक समीकरण झाल आहे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी समाजातील तळागाळातील फारशा शैक्षणिक सुविधा उपलब्ध नव्हत्या अशा या दुर्लक्षित समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शाखांचा सर्वार्थाने विस्तार केला कोणाचेही आर्थिक पाठबळ नसताना पण सामान्यांच्या जनाधारावर त्यांनी हे कार्य यशस्वीरित्या पार पाडले कै. नाना यांनी उभारलेले या संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ त्यांनी केली शिक्षणाने समाजात परिवर्तन होते माणूस विचारशील बनतो त्यामुळे शिक्षणाला पर्याय नाही या विचारावर ते ठाम होते शिक्षणासह मूल्य विचारांबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही त्यामुळे संस्थेच्या सर्व शाखा आजही बदलत्या काळाबरोबर नेहमीच प्रगतशील आणि ज्ञानाबद्दल अद्यावत राहिल्या आहेत. शाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गरजा, शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यासाठी कोणाचेही आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांनी स्वतःचे वैयक्तिक मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती त्यागाची परिसीमा यापेक्षा आणखीन काय असू शकते?
सातारा जिल्ह्याच्या नकाशावर शिक्षण क्षेत्रात श्रीराम एज्युकेशन सोसायटी चे नाव अग्रक्रमाने घेतले जाते याची श्रेय निर्विवाद काकांकडे जाते शिक्षण क्षेत्रात शिक्षक विद्यार्थी हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याने विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी अत्यंत जिव्हाळा व अभिमान होता तर शिक्षकांबद्दल आपुलकी प्रेम व अपेक्षाही होत्या शिक्षकांना त्यांनी ध्येयवादाचा मार्ग दाखवला आणि हाच ध्येयवाद शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती दुसऱ्यांना सतत प्रोत्साहन देणे त्यांना उपक्रमशील बनवणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट होते.
विद्यार्थी हा देशाचा एक चांगला सुसंस्कारित नागरिक झाला पाहिजे हा विचार त्यांनी आपल्या संस्थेच्या सर्व शिक्षक वर्गात सेवकांमध्ये रुजवला आहे. शिक्षण क्षेत्रातील एक मानदंड, आधुनिक विचारांचा पुरस्कर्ता, नवीन शैक्षणिक धोरणांचा पाठीराखा, एक सच्चा समाजसेवक म्हणून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. संस्थेतील त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल त्यांच्या मनी आदराची भावना आहे. प्रत्येक विषयाच्या खोलवर जाऊन त्या विषयाचा मागोवा घेण्याचा त्यांच्या चौकस स्वभावामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रात त्यांचा मित्र वर्ग विखुरला आहे. स्वतःच्या कुटुंबाबद्दल ते अत्यंत भावुक आहेत.
कै. नाना यांनी लावलेल्या शिक्षण रुपी रोपट्याचे अत्यंत अडचणीवर मात करीत त्यांनी विशाल वृक्षांमध्ये रूपांतर केले आहे तर त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी विशाल वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले आहे.
कै. काकांचे थोरले चिरंजीव श्री सचिन भैय्यासाहेब यांनी आपले आजोबा कै. नाना वडील कै. सुभाष काका यांच्याप्रमाणे स्वतःचे जीवन शिक्षणासाठी वाहून घेतले आहे. या त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ. ज्योतीताई यांचाही हातभार आहे आणि धाकटे चिरंजीव श्री महेंद्र भैय्या यांनी शिक्षणाबरोबर राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेची पताका हाती घेतली आहे.
माननीय श्री सचिन भैय्या यांच्या कार्याचा आवाका पाहून एका मान्यवर संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान केलेली आहे चालू वर्षी संस्थेच्या कार्याचा विस्तार आणि प्रगती पाहून महाराष्ट्र शासनाने संस्थेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन संस्थेच्या कार्याचा गौरव केला आहे.
महेंद्र भैय्या यांनी विभागीय व राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेस पक्षात जबाबदारीची पद मिळवलेली आहेत काँग्रेस पक्षाचे एक रचनात्मक कार्य करणारे उत्कृष्ट संघटक क्रियाशील खंदे नेते म्हणून ते पक्षात प्रसिद्ध आहेत तसेच ते फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. कै. काकांनी आयुष्यभर जे शैक्षणिक कार्य केले त्यात त्यांच्या सुविध्य पत्नी सविता काकी सर्वकाळ त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काकांना जे जे उत्तुंग यश मिळाले वेळोवेळी जो मानसन्मान मिळाला त्या यशात काकींचा सिंहाचा वाटा आहे.
अशा या दूरदर्शी व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या काकांचे शैक्षणिक कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याचा पाठपुरावा करणे हीच त्यांना खरी आदरांजली होईल त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
श्री.संतोष नारायण बाचल,
श्री जानाई हायस्कूल व जुनिअर कॉलेज राजाळे