फलटण प्रतिनिधी:-मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने बुधवार, दि. २५ ऑक्टोबरपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी फलटण तहसील कार्यालया बाहेर साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरू आहे,मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचे अल्टिमेटम दिले होते, ते अल्टिमेटम संपल्याने आजपासून पुन्हा एकदा साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे पाटील आज स्वत: अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणासाठी बसले असून मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी फलटण तहसील कार्यालया बाहेर मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले.
फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने फलटण तालुक्यात गाव पातळीवर साखळी उपोषण न करता फलटण तहसील कार्यालयाबाहेर एकाच ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून फलटण तालुक्यातील सर्व मराठा समाज या साखळी उपोषणास मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता. यावेळी साखळी उपोषणस्थळी उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.