सचिन मोरे, फलटण.
बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीची गणिते फसल्यामुळे भाजपला आता महाराष्ट्रावर अधिकाधिक अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे भाजप महायुतीतील एकनाथ शिंदे व अजित पवार गटासोबत जागा वाटपा संदर्भात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही. जिंकण्याची क्षमता या एकाच निकषावर जागावाटप केला जाईल, असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत दिल्याचे समजते.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये ३७० जागांचा आकडा पार करायचा आहे. त्यामुळे जिंकेल त्याला उमेदवारी या सूत्रानुसार भाजपने पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा केली होती. सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार असून दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी आघाड्यांच्या राज्यातील भाजपचे उमेदवार घोषित केले जाणार आहेत. भाजपसाठी दुसरी यादी सर्वात महत्त्वाची मानली जात असून इथेही जिंकण्याचे सूत्रच अवलंबले जाणार आहे.
https://dhairyatimess.com/post/96224 गौतमी पाटील आज या ठिकाणी
माढा लोकसभा मतदार संघ कोणाकडे राहणार हा तिढा अजून तुटलेला नाही. या मतदार संघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. माढा लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानसभेचे तीन व विधान परिषदेचा एक असे चार आमदार आहेत. भाजपकडे विधानसभेचे दोन व विधान परिषदेचे एक असे तीन आमदार आहेत. माढ्याची खासदारकी जरी राष्ट्रवादीने गमावली असली तरीही या मतदार संघात सध्या भाजपपेक्षा अजित पवार यांच्या गटाची ताकद मोठी आहे. त्यामुळे माढ्याच्या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा दावा अधिक प्रबळ राहण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवसांमध्ये दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे व अजित पवार यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार जिंकून येतील याची खात्री भाजपला द्यावी लागेल. अन्यथा भाजपने देऊ केलेल्या जागांवर समाधान मानावे लागेल.
माढा लोकसभा मतदार संघात माढ्याचा किल्ला भाजपाकडे मात्र किल्लेदार राष्ट्रवादीचे असल्याने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर उमेदवारीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
माढा मतदार संघ कोणाला हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत असला तरीही जिंकण्याचे सूत्रच अवलंबले जाणार असून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व विजयसिंह मोहिते - पाटील या मतदार संघात हुकमी एक्के ठरणार असल्याचे बोलले जात आहे. रामराजे यांना फलटण तालुक्यात राजकीय विरोधात कोणीही नको असल्याने रणजितसिंह यांना चितपट करण्याची ही संधी चालून आली आहे. तर विजयसिंह मोहिते - पाटील व खासदार रणजितसिंह यांची अनबन सर्वांना माहिती आहेच. त्यामुळे खासदार रणजितसिंह यांच्या समोर उमेदवारीचे मोठे आव्हान उभे असल्याचे बोलले जात आहे.