कोयना दूध संघ सहकारातील सर्वात जुना व सहकारी तत्वावर चालणारा पहिला दूध संघ आहे. माजी मंत्री कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या रूपाने संघाला चांगले नेतृत्व मिळाले होते. त्यामुळे संघाने अधिकाधिक नेत्रदीपक प्रगती केली आहे.
कराड : कोयना दूध संघ सहकारातील सर्वात जुना व सहकारी तत्वावर चालणारा पहिला दूध संघ आहे. माजी मंत्री कै. विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या रूपाने संघाला चांगले नेतृत्व मिळाले होते. त्यामुळे संघाने अधिकाधिक नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्यामुळे या संघास यापुढे लागेल ते सहकार्य त्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महानंद दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
खोडशी, ता. कराड येथील कोयना दूध संघास नुकतीच महानंद दूध संघ मुंबईचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्यासह संघाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, कार्यकारी संचालक श्यामसुंदर पाटील, संचालक सुभाष निकम व प्रशासकीय अधिकारी यांनी भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, उपाध्यक्ष बाबुराव धोकटे, माजी अध्यक्ष संपतराव इंगवले, कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, संचालक लक्ष्मण देसाई, तानाजीराव शेवाळे, शिवाजीराव शिंदे, रामचंद्र बल्लाळ, आकाराम मदने आदीसह जयवंत चव्हाण, सयाजीराव मोहिते, गणेश जाधव, श्रीकांत हणबर, अनिल कुलकर्णी, तानाजीराव पाटील, सुभाष माने आदी. उपस्थित होते.
रणजितसिंह देशमुख म्हणाले, सध्या, सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम अनेकजण करत आहेत. त्यामुळे सहकाराची 70 टक्के खाजगीकरण आणि 30 टक्के अशी अवस्था झाली आहे. परिणामी सहकारी संस्थांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, सहकारी दूध संस्था टिकाव्यात व त्यामधून शेतकरी, सर्वसामान्यांचे कल्याण व्हावे, यासाठी महानंदचे मोठे योगदान राहणार आहे. महानंद दूध संस्था ही राज्यातील सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था असून त्यामाध्यमातून कोयना दूध संघाला लागणारे सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
वसंतराव जगदाळे म्हणाले, कोयना दुध संघास विलासकाका पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने संघ प्रगतीपथावर आहे. तसेच संघाची वाटचाल युवा नेते अॅड. उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्कृष्टरित्या सुरु असून दिवसेंदिवस ती अधिकाधिक प्रगतीपथावर जाईल, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोयना दूध संघाचे कार्यकारी संचालक अमोल गायकवाड यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. दरम्यान, महानंद दुध संघाचे उपाध्यक्ष डी.के. पवार, कार्यकारी संचालक श्यामसुंदर पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कोयनेचे संचालक शिवाजीराव जाधव यांनी आभार मानले.